उत्तर प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, सात जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बदायू

उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात पूर्ण इमारत कोसळली. या दुर्घटनेत जागीच सात जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बदायू जिल्ह्यातील रसूलपूरमध्ये एका दुकानात बेकायदेशीर फटाक्यांची निर्मिती आणि विक्री होत होती. शुक्रवारी अचानक या कारखान्यात आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात पूर्ण इमारत कोसळली आणि सात जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाली आहेत. दुर्घटनेत मृत पावलेले लोक स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याच इमारतीत पाच दुकानांची कामं सुरू होती, तीसुद्धा या स्फोटात जमीनदोस्त झाली. स्फोट खूप भीषण होता, त्यामुळे काही काळासाठी गावात मोठी धावपळ झाली. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल केले.