
सामना प्रतिनिधी । कराड
सह्याद्रीच्या विस्तारीकरणासाठी सहकार मंत्र्यांना भेटलो. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी तुमच्या एवढ्या साखरेचे करणार काय, असा सवाल करत सह्याद्रीच्या विस्तारीकरणाच्या मुद्दाला बगल दिली असल्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. खासगीत मोठया प्रमाणावर विस्तारवाढ होत आहे. मग सह्याद्रीला विरोध का? असा सवाल करुन पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्या आणि शेतकर्यांच्या उसाचे संपूर्ण गाळप करणे काळाची गरज असणार्या विस्तारीवाढीसाठी सह्याद्री लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
यशवंतनगर (ता.कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा २०१८-२०१९ या ४५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व त्यांच्या सुविद्यपत्नी अनुराधा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, कराड पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, जिल्हा सहकार भवन सदस्य संजय साळुंखे, माजी सभापती बबनराव कदम, शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटे, वनिता माने, वडगावचे सरपंच संतोष घार्गे, कराड उत्तरच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष प्रभावती माळी, कराड दक्षिणच्या अध्यक्षा मीनाताई बोरगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
सह्याद्रीच्या उच्चांकी दराने अनेकांना धडकी भरत आहे. सहकारी कारखानदारी कशी असावी याचे आदर्श उदाहरण म्हणजे सह्याद्री साखर कारखाना असून अचूक ऊस नोंदणीपासून शेतकर्यांच्या हातात बिल मिळेपर्यंत सगणकता आणि पारदर्शकता यामुळे ‘सह्याद्री पॅटर्न’ महाराष्ट्रातील सहकार कारखानदारीला दिशादर्शक ठरेल, असे गौरोद्गार माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काढले.
प्रभाकर देशमुख म्हणाले, दिवंगत पी. डी. पाटील यांचा वारसा घेवून दूरदृष्टी आणि कल्पकतेने काम करुन आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या कुशल नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. सह्याद्री कारखान्याच्या स्थापनेपासून गळीतामध्ये दहापटीने वाढ झाली आहे. कारखान्याने सुरु केलेल्या पाणी पुरवठा योजना आणि इतर योजनांचा पाठपुरावा यामुळे कारखन्याच्या कार्यक्षेत्रात भरघोस भरघोस ऊस असून कारखाना उसासाठी स्वयंमपूर्ण आहे. कारखान्याला सह्याद्रीला ऊस बहेरुन आणण्याची गरज नाही. शेतकरी केंद्रबिंदू मानून सह्याद्री कारखान्याची वाटचाल सुरु असून कारखान्याच्या विस्तारीकरणाला कोणी हरकत घेईल अशी परिस्थिती नसून लवरच कारखान्याच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळेल.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रत्येक वर्षी सहकारी कारखानदारीमध्ये संकटे येत असतात. यावर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परििस्थिती आणि हुमणीचे संकट आले असून सहकारी कारखानदारीपुढे मोठे आव्हान आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील शासन अजून ते जाहीर करत नाही. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे हे सरकार गांभीर्याने पहात नाही. चालूवर्षात सह्याद्रीकडे अवाश्यक तोडणी यंत्रणा असून ऊस वेळेत तोडला जाईल असे सांगून पुढील वर्षात इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा संकल्प मंडळाने केला असून दिवाळीपूर्वी ठेवीवरील व्याज देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील माने म्हणाले, भाजप नुसच्या घोषणाबाजी करण्यात पटाईत असून डोंगराएवढे बोलणे पण काम टेकडीएवढेही करत नाही. आ.बाळासाहेब पाटील हे टेकडीएवढे बोलतात पण काम डोंगरापेक्षाही अधिक करतात. आ. पाटील यांच्या नेटक्या नियोजनाने सह्याद्री कारखाना धीही तोटयात गेला नाही. केंद्र व राज्य सरकारच्या चुकी घ्या धोरणामुळे सहकारी कारखानदारी अडचणीत आली आहे. परंतु सहकार टिकला तरच महाराष्ट्र टिकेल. अनेक अडचणीवर मात करत सहकारातील आदर्श मंदिर म्हणून सह्याद्रीकडे पहावे लागेल. आ. बाळासाहेब पाटील यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जपण्याची गरज आहे.
यावेळी शहाजी क्षीरसागर, देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील कारखान्याची माहिती दिली. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब मदने, अण्णासाहेब माने यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, कार्यक्षेत्रातील विविध गावचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
सह्याद्रीने गटशेतीचा संकल्प राबवावा : देशमुख
ग्रामीण भागामध्ये शेतीचे उत्पन्न कमी-कमी होत चालले आहे. उच्च उत्पादन वाढीसाठीव शाश्वत शेतीसाठी नवनवीन उपक्रम राबवले पाहिजेत. निसर्गामध्ये होत असलेत्त्या बदलामुळे हुमणीसारखे संकट येत आहेत. शेतीचे ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी गटशेती चांगले व्यासपीठ होऊ शकते. प्रत्येक गळीत हंगामात नवनवीन संकल्पना राबविणार्या सह्याद्री कारखान्याने आता गटशेतीचा उपक्रम राबवावा, असे आवाहन करत त्याने एकरी टनेज व उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.































































