
>> प्रदीप म्हात्रे
सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱया प्रा.अभय अष्टेकर यांना अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे दिला जाणारा यंदाचा आइन्स्टाईन पुरस्कार जाहीर झाला. करीअरची सुरुवात करताना इंजिनीअरिंग की मूलभूत विज्ञान, असा प्रश्न समोर आल्यावर प्रा.अष्टेकर यांनी ठरवून मूलभूत विज्ञानाची निवड केली होती. ती किती सार्थ होती ते त्यांच्या संशोधनाने तर सिद्ध झालेच, पण आता प्रतिष्ठsचा ‘आइन्स्टाईन’ पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे.
चार दशकांपासून गुरुत्वाकर्षण विषयात कार्यरत असलेल्या प्रा. अभय वसंत अष्टेकर यांना ‘आइन्स्टाईन पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नावाने एक वर्षाआड देण्यात येणाऱया या पुरस्काराची सुरुवात सन 2003 पासून झाली. प्रा. अष्टेकर हे या पुरस्काराचे नववे मानकरी होत. प्रा. अष्टेकरांना हा पुरस्कार त्यांच्या सामान्य सापेक्षता, कृष्णविवर सिद्धांत आणि पुंजभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाकरिता देण्यात येणार आहे. अमेरिकेतील पॅन सिल्व्हानिया स्टेट विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड दी कॉसमॉस’ या खगोलभौतिकी आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी संशोधन संस्थेचे ते संचालक असून एबरली चेअर प्रोफेसर आहेत. अष्टेकर यांचा जन्म 5 जुलै 1949 रोजी झाला. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. विद्यार्थीदशेत असतानाच न्यूटनच्या सिद्धांतांकडे ते आकर्षिले गेले. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून त्यांनी संशोधनाला सुरुवात करत 1974 मध्ये प्रा. रॉबर्ट गेरोक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी प्राप्त केली. त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले असून फ्रान्स, कॅनडा आणि हिंदुस्थानात महत्त्वाच्या पदांवर काम करत आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादनाची जबाबदारी पार पाडली आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवादाला एकत्र आणणाऱया पुंजकीय गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अष्टेकरांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. क्वांटम फिजिक्स आणि सामान्य सापेक्षता यांच्या एकत्रीकरणातून त्यांनी ‘लूप क्वांटम ग्रॅव्हिटी’ हा नवा सिद्धांत मांडला. ज्या ठिकाणी व्यापक सापेक्षतावादाच्या मर्यादा स्पष्ट होतात अशा अत्यंत घन स्वरूपातल्या पदार्थांशी निगडित परिस्थितीत अष्टेकरांनी विकसित केलेल्या सिद्धांताचा वापर करता येतो. या सिद्धांताद्वारे विश्वनिर्मितीनंतर काही काळात निर्माण झालेली परिस्थिती आणि महास्फोटाच्या अगोदरच्या स्थितीचाही विचार करणे शक्य झाले. तसेच कृष्णविवराच्या निकटच्या परिस्थितीसाठीही हा सिद्धांत उपयुक्त आहे. या सिद्धांतात वापरल्या गेलेल्या चल राशींना ‘अष्टेकर व्हेरिएबल्स’ म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून बी.एस्सी. करत असताना अष्टेकर प्रा. भा. मा. उदगावकरांच्या संपर्कात आले. प्रा. उदगावकरांनी राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना दर आठवडय़ातून एकदा टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भौतिकी विषयातील चर्चेसाठी बोलावले, त्यात त्यांचा समावेश होता. प्रत्येक दिवसाची चर्चा किमान दोन तास चाले. त्यावेळी प्रा. उदगावकरांनी त्यांची ओळख प्रा. यशपाल आणि त्यांचे विद्यार्थी रामनाथ कौशिक यांच्याशी करून दिली. ते त्यांना अवघड प्रश्न विचारत असत, शिवाय त्यांची शिकविण्याची पद्धत नावीन्यपूर्ण व मुळापासून विचार करायला लावणारी असल्यामुळे भौतिकी आणि विज्ञान संशोधन या दोन विषयांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर त्यांनी फेनमनची भाषणेही वाचली. बी.एस्सी. करताना पुस्तकात दिलेली उदाहरणे त्यांनी सोडवावीत म्हणून प्रा. उदगावकर आणि प्रा. यशपाल यांचा आग्रह होता. त्यातील एक उदाहरण सोडवताना पुस्तकात शेवटी दिलेल्या उत्तराशी अष्टेकरांचे उत्तर बरोबर जुळले, पण नंतर त्यात तार्किकदृष्टय़ा काहीतरी चूक असल्याचे लक्षात आले. म्हणून तेच उदाहरण पुन्हा अधिक लक्षपूर्वक सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पुस्तकातील अर्ध्या उत्तरापर्यंतच ते पोहोचू शकले. त्यामुळे अष्टेकर कमालीचे अस्वस्थ झाले. पुढील चर्चेच्या वेळी ही बाब त्यांनी प्रा. उदगावकरांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यावेळी “पुस्तकात उत्तर लिहिणाऱयाने तुमच्यासारखीच काही तार्किक चूक केली आहे’’ असे जेव्हा उदगावकरांनी सांगितले तेव्हा अष्टेकरांचे मनोधैर्य वाढले. अर्थात तेवढय़ावरच ते थांबले नाही तर त्या पुस्तकाचे लेखक फेनमन यांना सविस्तर पत्रही लिहिले. आश्चर्य म्हणजे फेनमन यांनी स्वतः त्यांना पत्र लिहून पुस्तकात चूक झाल्याचे मान्य केले.
हिंदुस्थानी शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्याविषयी प्रा. अष्टेकर यांना प्रचंड आत्मविश्वास असून आगामी काळात ते मूलभूत संशोधनात आणखी महत्त्वाची आणि मुलभूत कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.





























































