
सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी
निलंगा ते औराद रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 काम सुरू असून सदरील काम बेकायदेशीर आहे. म्हणून शेतकऱ्यांनी अगोदरच प्रशासनाला निवेदने देऊन मोबदला मिळेपर्यंत किंवा संपादित केलेल्या जमीनीचे पुरावे मिळेपर्यंत सदरील काम थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी रस्त्यावर उतरुन काम थांबविलेले. तेव्हा औराद पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अडचण समोर ठेऊन जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्थानकात बोलावुन घेतले. पण शासनातर्फे किंवा संबंधीत काम चालु असलेल्या गुत्तेदार किंवा अधिकारी यांनी फिर्याद न दिल्याने 149 अंतर्गत नोटीस देऊन रीतसर न्याय मागणी करावी अशी सर्व शेतकऱ्यांना सुचना केली.
सदरील रस्ता निजामकालीन अधिग्रहण केलेला असल्यामुळे रस्त्याची 15 मीटर वहीवाट असुन सध्या मोजक्याच गावच्या जमिनी भूसंपादनाच्या सूचनेनुसार संपादीत करत आहेत. प्रत्यक्षात मात्र जमिनीवर बेकायदेशीर काम सुरू असून जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत काम थांबवण्याची मागणी 150 शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. निलंगा तालुक्यातील शिरसी, हंगरगा, हलगरा म्हसोबावाडी, अनसरवाडा इत्यादी गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनीवर महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचे काम सुरू आहे. सदरील महामार्ग हा पूर्वीच्या राज्य महामार्ग क्रमांक 165 वरून प्रस्तावित असून पूर्वी राज्यमार्ग हा जिल्हा मार्ग असताना भुसंपदित झालेला आहे. याबद्दल संबंधित विभागास माहिती मागितली असता, त्यांच्याकडे माहिती उबलब्ध नाही.
सदरील रस्त्याची वहिवाट आजतायगत 15 मीटर रुंद पेक्षा कमी आहे. राज्य महामार्ग रूपांतर झाले वेळी सदरील रस्त्याची भुसंपादनांची प्रक्रिया करण्यात आली नाही. सदरील रस्त्याची फक्त अपग्रेडशन झाले आहे. 15 मीटर रस्ता सोडल्यास सबंधित रस्त्याच्या बाजूस शासनाचा काहीही संबध नसताना आमच्या मालकीची वहिवाट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वरील रस्त्याचे काम बेकायदेशीर असून विनापरवाना आमच्या शेतातील वृक्ष तोडण्यात आली आहेत. सदरील रस्त्याची उंची ही सध्याच्या राज्यमार्ग पेक्षा व चालू शेती जमिनीपेक्षा काही ठिकाणी 3 मीटर तर काही ठिकाणी 2 मीटर वेगवेगळी असणार आहे त्यामुळं शेतीतील शेतमाल, ऊस, भाजीपाला सदरील रस्त्यावर घेऊन जाणे अशक्य होणार आहे त्यामुळे ठिकाणी भुयारी रस्ते व नाले काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी करत तत्काळ भुसंपादन करुन जमिनीचा मोबदला देण्यात यावा अन्यथा काम थांबवावे यावे अशी मागणी राहुल माकणीकर, सुधीर मसलगे, प्रशांत नखाते, बालाजी उसनाळेसह परिसरातील 150 शेतकऱ्यांनी केली आहे.

































































