निगरगट्ट भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागावी,  डॉ. चौधरींची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

“शहरातील समांतर रस्त्यांसाठी नेहमीच वेगवेगळी कारणे भाजप नेते देत आहेत. समांतर रस्त्याच्या नावाखाली भाजपने दोन निवडणूका जिंकल्या आहेत. मात्र समांतर रस्ता होत नाही. दररोज निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. यामुळे खोटे आश्वासने देणार्‍या निगरगट्ट भाजप नेत्यांनी जळगावकरांची जाहीर माफी मागावी अशी” मागणी काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

शहरातील समांतर रस्त्यासाठी आतापर्यंत बरीच आंदोलने झाली आहेत तरी देखील हा रस्ता होत नाही. दररोज निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. शहरात भाजपचे आमदार आहेत, खासदार भाजपचे आहेत राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तरी देखील रस्ता होत नसेल तर यात राज्यकर्त्यांचाच दोष असल्याचे ते म्हणाले.

गेल्या 600 दिवसांपासून दररोज ट्विट

डॉ. राधेशाम चौधरी यांनी समांतर रस्त्यांसाठी 30 जानेवारी 2016 रोजी महामार्गावर 8 कि.मी. चा गांधी मार्च काढला होता. त्या दिवसापासून डॉ. चौधरी दररोज पंतप्रधान, रस्ते व परिवहन मंत्रालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करुन आठवण करुन देत आहेत. आज 600 ट्विट पुर्ण झाले आहेत. एका ट्विटवर काम करणारे हे भाजप सरकार याकडे कसे काय दुर्लक्ष करु शकते असा सवाल डॉ. चौधरी यांनी उपस्थित केला आहे. समांतर रस्त्यासाठी 10 हजार पत्र पंतप्रधानांना पाठविण्याची मोहिम देखील घेण्यात आली आहे.

भाजपचे षडयंत्र वेगळेच असल्याची शंका

राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 चे काम देखील रखडले आहे. कदाचित ते काम पुर्ण झाले तर शहरातून जाणारा रस्ता केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली राहणार नाही. म्हणून या रस्त्याबाबत उदासीन धोरण अवलंबले जात आहे. हे एक षडयंत्र असून 5 लाख जळगावकरांच्या भावनांशी खेळ सुरु असल्याची टीका त्यांनी केली.