
सामाना प्रतिनिधी। नवी दिल्ली
देवधर ट्रॉफीच्या नवी दिल्ली येथे झालेल्या अंतिम लढतीत दोन मुंबईकराचा शतकी झंझावात क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर या दोघांनी अनुक्रमे नाबाद 144 धावा आणि 148 धावांची जबरदस्त खेळी साकारत शनिवारचा दिवस गाजवला. हिंदुस्थान ‘क’ संघाने हिंदुस्थान ‘ब’ संघावर 29 धावांनी विजय मिळवत देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
हिंदुस्थान ‘क’ संघाकडून मिळालेल्या 353 धावांचा पाठलाग करणार्या हिंदुस्थान ‘ब’ संघाला 323 धावांपर्यंत मजल मारता आली. ऋतुराज गायकवाडने 60 धावांची खेळी करीत आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर हिंदुस्थानच्या ट्वेण्टी-20 संघात निवड झालेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने 114 चेंडूंत 8 षटकार व 11 चौकारांची बरसात करीत 148 धावांची जबरदस्त खेळी केली.
सलामीवीरांचा सेंच्युरी धमाका
हिंदुस्थान ‘क’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अजिंक्य रहाणे व इशान किशन या सलामी जोडीने 210 धावांची खणखणीत सलामी देत आपले इरादे स्पष्ट केले. इशान किशनने 87 चेंडूंत 6 षटकार व 11 चौकारांसह 114 धावांची आणि अजिंक्य रहाणेने 156 चेंडूंत 3 षटकार व 9 चौकारांसह नाबाद 144 धावा पटकावल्या.



























































