
सामना प्रतिनिधी । ठाणे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा मटण बिर्याणीने पाहुणचार करणाऱया ठाण्यातील पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. रुग्णालयात नेण्याच्या नावाखाली आलिशान गाडीत झणझणीत जेवण दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा दणका दिला. त्यामुळे व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱया पोलिसांना मटण बिर्याणी चांगलीच ‘गरम’ पडली आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरला खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या असून त्याचा सध्या मुक्काम ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी व सूरज मनवार यांनी इक्बालला दोन दिवसांपूर्वी ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेले होते. मात्र पोलीस व्हॅनमधून नेण्याऐवजी एका आलिशान खासगी गाडीमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. इतकेच नाही तर गाडीमध्येच त्याला गरमागरम मटण बिर्याणी खाऊ घातली. नेमकी ही व्हीआयपी ट्रीटमेंट एका नेटिझनने आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याने ठाणे पोलिसांची नाचक्की झाली होती. याबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना ही बाब समजताच त्यांनी गंभीर दखल घेत उपनिरीक्षक रोहिदास पवारसह चार कॉन्स्टेबलना निलंबित केले.
‘सेटिंग’ करणाऱयांना चाप बसणार
सेंट्रल जेल तसेच कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये अनेकदा गुन्हेगारांकडे मोबाईल तसेच धारदार शस्त्र्ाs सापडली होती. सुरक्षारक्षकांनी पैशांची सौदेबाजी केल्यामुळेच हे प्रकार वाढल्याचा आरोप होत आहे. मात्र इक्बाल कासकर प्रकरणावरून पोलीस आयुक्तांनी पाच पोलिसांना दिलेल्या दणक्यामुळे ‘सेटिंग’ करणाऱयांना चाप बसणार आहे.





























































