
सामना प्रतिनिधी । शिरोळ
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी व अधिक दोनशे रूपये कारखानदारांनी द्यावेत अन्यथा ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. कारखानदार आणि शासनाकडून शेतकऱ्याच्या घामाचे दाम घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील सतराव्या ऊस परिषदेत दिला आहे. ज्यांचे रिफायनरी उद्योग आहेत अशा व्यापाऱ्यांनी साखरेचे भाव खाली पाडले, सरकारला चुकीची माहिती देऊन कच्ची साखर आयात केली व ती पक्की करून इथेच विकली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. या ऊस परिषदेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह कर्नाटकातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या ऊस परिषदेत 11 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या ऊस परिषदेच्या अध्यक्षस्थानी दशरथ सावंत होते. तसेच अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, वस्त्रोद्योगचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे, संदीप जगताप, पुष्पाताई मोरे, रसिकाताई ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऊस परिषदेत मंजूर झालेले ठराव
1) 3 ऑगस्ट 2018 रोजी लोकसभेत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव विधेयक – 2018 व संपूर्ण कर्जमुक्तीचा अधिकार विधेयक -2018 ही दोन विधेयके सादर केली आहेत. ही विधेयके संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन मंजूर करावीत.
2) ज्या साखर कारखान्यांनी अद्याप 2017-18 सालची एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात टाकावे. तसेच राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी साखरेवरील कर्ज स्वरूपातील उचल 90 टक्के करण्यात यावी.
3) राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत विनानिकष दुष्काळ जाहीर करून राज्यात आधारभूत किंमतीवर भात, सोयाबिन, तूर, मका, उडीद व मूग यांची खरेदी केंद्र शासनाने त्वरीत सुरू करावीत.
4) केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीचा बेस 9.50 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. तो त्वरीत रद्द करून पुर्वीप्रमाणे 9.50 टक्के करावा, तसेच केंद्र सरकारने साखरेच्या विक्रीचा किमान दर प्रतिक्विंटल 3400 रूपये करावा.
5) मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला त्वरीत आरक्षण देण्यात यावे.
या ठरावांसह 11 ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आले.


























































