
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून होणारे स्नाइपर हल्ले रोखण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. सप्टेंबरपासून आतापर्यंत स्नाइपर हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानने प्रशिक्षित केलेले चार स्नायपर कश्मीरमध्ये सक्रीय असल्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्यामुळे लष्कराच्या जवानांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच असे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा इतर रणनीतीचा पर्याय शोधत आहे.
दहशतवादी लांब लपून सुरक्षा दलाच्या जवानांना स्नायपर हल्ल्याने लक्ष्य करत आहेत. आगामी काळात सुरक्षा दलाच्या जवानांवरील अशा हल्ल्यांच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत गुप्तहेर विभागाने दिले आहेत. या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कर, सीआरपीएफ, राज्य पोलीस, सुरक्षा दलासह लष्करी शिबीरात राहणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांसाठी सर्तकतेच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पहिला स्नायपर हल्ला 18 सप्टेंबरला पुवामामध्ये झाला होता. त्यानंतर इतर ठिकाणीही असे हल्ले करण्यात आले. त्यात आतापर्यंत तीन जवान शहीद झाले आहेत. सप्टेंबरमध्ये जैश ए मोहम्मदचे दोन स्नायपर गट कश्मीरमध्ये दाखल झाल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांनी दिली आहे. त्या गटात दोन स्नायपर आहेत. सध्या कश्मीरमध्ये चार प्रशिक्षित स्नायपर सक्रीय असून ते पुलवामामध्ये लपल्याची माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांकडे एम 4 कार्बाइन्स आहेत. ही शस्त्रे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सेना आणि पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकाकडूनही वापरली जातात.
लष्कराच्या जवानांवर पाळत ठेवून लांबच्या ठिकाणी लपून दहशतवादी जवानांना लक्ष्य करतात. जवान फोनवर कुटुबीयांशी संवाद साधत असताना मोबाईच्या प्रकाशाचा वेध घेऊन जवानांवर गोळीबार करण्यात येतो. एम 4 कार्बाइनमध्ये टेलिस्कोप असतो. तसेच रात्रीच्या अंधरातही वेध घेता येईल असे तंत्रज्ञान त्यात असते. 500 ते 600 मीटरच्या अंतरावरूनही वेध घेण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे दहशतवादी लांबूनच मोबाईलच्या प्रकाशाचा वेध घेऊन जवानांना लक्ष्य करून पोबारा करत आहेत. त्यामुळे असे हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर आहे.

























































