
सामना प्नतिनिधी। नांदेड
नियोजन मंडळाचे सभागृह हे कुठल्या पक्षाचे नाही, सबंध जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे व जनतेचे आहे, या सभागृहात यापुढे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असे सुनावत सभागृहात बेशिस्तीने वागणाऱ्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.नांदेड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सोमवारी येथील भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री बोलत होते.
शिस्तीने सभागृह चालावे, यासाठी मी सुरुवातीपासूनच सूचना दिल्या आहेत. मात्र कुठलाही सदस्य उठतो आणि कुठलेही प्रश्न विचारतो, सभागृहाची परवानगी घ्यायची नाही, तसेच विनाकारण विषय नसलेले प्रश्न उपस्थित करायचे, हा कुठला प्रकार असा संतापजनक सवाल पालकमंत्र्यांनी यावेळी केला. मी कुणालाही घाबरत नाही आणि भीतही नाही, दबावतंत्राचा वापर करुन काम चालणार असेल तर तेही खपवून घेणार नाही, या शब्दात त्यांनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला. सभागृहात शिस्त मोडणाऱ्या बापूराव गजभारे, माधव बेळगे, प्रकाश भोसीकर, रामराव नाईक यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली. आजचा प्रकार जाणूनबुजून घडवून आणला आणि काँग्रेसने बेशिस्तीचे प्रदर्शन केले. हा प्रकार दुर्दैवी तसेच संतापजनक असल्याचा आरोप त्यांनी केला. मी शिस्तीचा भोक्ता आहे, बेशिस्त खपवून घेणार नाही, अशी परखड प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.
मागच्या बैठकीत देखील पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रकार हाणून पाडण्यात शिवसैनिकांनी महत्वाची भूमिका बजावून काँग्रेसला पळताभुई थोडी केली होती. दरम्यान सभेचे कामकाज संपल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सभागृहात सदस्यांना बोलू न दिल्याबद्दल आमदार अमर राजूरकर यांनी निषेध नोंदवला. तर घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे मत आमदार डी.पी.सावंत यांनी मांडले. सदस्यांना बोलू दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतलेली कणखर भूमिका आणि त्यांचे बाणेदार उत्तर यामुळे सर्वच शिवसैनिकांनी आज त्यांचे जोरदार स्वागत केले. सभागृहा बाहेर येताच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देवून पालकमंत्री आगे बढो हम तुम्हारे साथ है, दादागिरी नही चलेगी नही चलेगीच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव पाटील बोंढारकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी उपस्थित राहून पालकमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.































































