
सामना ऑनलाईन । उज्जैन
भाजपवाले तुम्हाला भजे तळण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, तुम्ही भजे तळाल, तर भाजपवाले तुमचा पैसा आणि तेल चोरतील अशी झोबंणारी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली. सोमवारी ते तिसऱ्यांदा उज्जैनमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महाकालचे दर्शन घेऊन त्यांना पंचामृताचा अभिषेक केला. त्यानंतर झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. भाजपने राज्यात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी क्षिप्रा नदीचे पाणी चोरले आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र पर्वणीतही त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आता तुम्हाला भजे तळण्याचा सल्ला देऊन तुमचे तेल आणि पैसा चोरण्याचा त्यांचा इरादा आहे अशी टीका राहुल यांनी केली.भाजपवाले धर्माचा मुद्दा नेहमी उचलतात. मात्र, भ्रष्टाचार हाच त्यांचा धर्म आहे, असे राहुल म्हणाले.
देशांचे अर्थमंत्रीच चोरांना देशाबाहेर जाण्यासाठी मदत करतात. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. विजय मल्ल्या परदेशात जाण्यापूर्वी आपल्याला भेटला होता. त्याने सेटलमेंटच्या प्रस्तावाबाबतही सांगितले होते, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अर्थमंत्र्यांनी चोरांना भेटीसाठी वेळ का दिली असा सवालही त्यांनी केला. मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी 35 हजार कोटी घेऊन देशाबाहेर पळाले आहेत. काँग्रेसने एका वर्षात मनरेगामध्ये जेवढा पैसा गुंतवला, तेवढा पैसा घेऊन मोदी देशाबाहेर पळून गेला, असा आरोप राहुल यांनी केला.
राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास 10 दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान फक्त घोषणा करतात.मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारने जम्मू कश्मीरची परिस्थिती बिघडवली आहे. दहशतवाद्यांसाठी त्यांनी दरवाजे उघडले आहेत. सीमेवर दररोज लष्कराचे जवान शहीद होत आहे. मात्र, सरकार राजकारण करण्यात गुतंले आहे, असा आरोपही राहुल यांनी केला. सरकारने महागात राफेल करार केल्याचे ते म्हणाले. राफेलची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना चौकीदाराने हटवल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांचे गोत्र कोणते?
राहुल गांधी यांनी महाकाल मंदिरात पूजा केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल यांचे गोत्र कोणते, ते नेमके कोणते ब्राह्मण आहेत असा सवाल केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. निवडणुकीच्या काळात राहुल जानवेधारी ब्राह्मण असल्याचा प्रचार करण्यात येतो. मात्र, राहुल नेमके कोणते ब्राह्मण आहेत. त्यांचे गोत्र काय असा सवाल पात्रा यांनी केला. कपड्यांवर जानवे घालून कोणीही ब्राह्मण होत नाही. असे करून तुम्ही ब्राह्मणांचा अपमान करत आहात, असा आरोपही पात्रा यांनी केला. पात्रा यांचे हे वक्तव्य जातीयवादी असून ते फुटीचे राजकारण करत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला आहे.



























































