
सामना ऑनलाईन । मुंबई
आपण माणूस म्हणून किती सक्षम आहोत याची प्रचिती लोअर परळमध्ये पाहायला मिळाली. ‘सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट’ ह्या संस्थाने ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना परळ मध्ये राबवली होती. ’सक्षम भारत’ या उपक्रमाअंतर्गत ही संकल्पना राबविण्यात आली होती. ही संकल्पना मुळात इराणची. हा उपक्रम सध्या ‘वॉल ऑफ काइंडनेस’ या नावाने जगभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. वर्षांपासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, अकोला, जालना आणि मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘माणुसकीची भिंत’हा उपक्रम राबविण्यात आला होता.
‘माणुसकीची भिंत’ ही भिंत दिनांक, 25 ऑक्टोबर बुधवार ते 29 ऑक्टोबर पर्यंत रहेजा टॉवरच्या बाजूला, नेरलॉक पेंटच्या समोर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (प) मुंबई येथे गरिबांच्या सेवेसाठी उभारली गेली होती. दुसऱ्यांचा विचार करणारी आपली भारतीय संस्कृती जपत. आपल्याजवळ असलेल्या अनावश्यक वस्तू गरजवंतांच्या उपयोगी याव्यात याकरीता अनेक मदतीचे हात पुढे आले त्यामधूनच पाच दिवसामध्ये 54369 हजार कपडे जमा झाले. तर 22 सायकली आणि 159 खेळणी जमा झाली होती. अनेक गरजू व्यक्तींनी या भिंतीचा सहारा घेतला.
”या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, दुर्बल घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असून मुंबईकरांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादबद्दल धन्यवाद ” असे संस्थेचे अध्यक्ष ‘पुंडलिक लोकरे’ यांनी सांगितले.




























































