दुष्काळ तोंडी जाहीर; आदेश अद्याप नाहीत, दुष्काळग्रस्त मदतीच्या आशेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

मुख्यमंत्र्यानी गंभीर दुष्काळ जाहीर करताच उपाययोजना राबवण्याचे अधिकार जिल्हाप्रशासनाला प्राप्त होत असतात, आपत्कालीन व्यवस्था कार्यवाही सुरू करत असते. मात्र बीडमध्ये वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे बीडसह 26 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असतांना पाण्याच्या टँकरसाठी अजून ही ग्रामस्थानां उपोषणाला बसावे लागत आहे. टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी असा प्रवास करत आहे म्हणजेच दुष्काळ तोंडी जाहीर झाला अद्याप उपाययोजना राबवण्याचे आदेश प्राप्त झाले नाहीत.

राज्यात 26 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, दुष्काळाची घोषणा करून 15 तासाचा कालावधी उलटला मात्र दुष्काळी उपाय योजना राबवण्यासाठी जिल्हाप्रशासनाला अद्याप ही अधिकार प्राप्त झालेले नाहीत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था कामाला लागते. बीड जिल्ह्यात पाण्याच्या टँकरच्या मागणीसाठी ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागत आहे, तीन दिवसांपासून गेवराई तालुक्यातील पवळाची वाडी येथील नागरिक उपोषणाला बसले आहेत. तर जिल्हाभरात टँकरच्या मागणीचे शेकडो प्रस्ताव धूळखात पडले आहेत, प्रस्ताव संबंधित पंचायत समितीकडे जातील, गटविकास अधिकारी पाहणी करेल, हा प्रस्ताव पुढे जिल्हापरिषद कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाईल, तेथून जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रवास प्रत्येक प्रस्तवाला करावा लागत आहे, दुष्काळ जाहीर करूनही कागदी घोडे का नाचवले जात आहेत हा प्रश्न उपस्थित केल्यावर दुष्काळ जाहीर झाला. मात्र आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे समोर आले आहे.