लेख : बाजारपेठेत रोखीची चणचण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुभाषचंद्र सुराणा<<

ग्राहकवर्ग ऑनलाइन किंवा मॉल्सकडे खरेदीसाठी वळल्याने छोटे–मोठे व्यापारी हतबल झालेले असून हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? सणासुदीच्या तोंडावर व्यापारी चिंतातुर झालेला आहे व त्यात वाढती महागाई आणि दुष्काळी परिस्थिती त्यामुळे दिवाळीवर मंदीचे सावट येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. छोटय़ा व्यापारीवर्गाकडे धंदा नसल्याने व्यवहारात–बाजारात रोख उलाढाल ठप्प झाल्याने पैशाची चणचण सर्वत्र भासत आहे.

दिवाळी तोंडावर आलेली असूनही बाजारपेठेतून ग्राहकांची वर्दळ नाही. दसरासुद्धा व्यापारी वर्गाला दिलासा देऊ शकला नाही. दसरा सण फेल झाला अशी ओरड व्यापारी वर्गातून होत असताना दिवाळी लक्ष्मीदर्शनाची जावो अशी अपेक्षा व्यापारी वर्गाची आहे.

दीपावली सणासाठी सर्व बाजारपेठातून ग्राहकांना जी काही आवश्यक खरेदी करावयाची आहे त्या सर्व वस्तूंचा, व्यापारी वर्गातून दुकानापासून भरपूर स्टॉक असून अजूनही मालाची आवक होत आहे; परंतु बाजारपेठेतून ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड सुरू न झाल्याने व्यापारी वर्ग धास्तावलेला आहे.

गैरबँकिंग वित्तीय क्षेत्र हे सध्या रोखीच्या चणचणीच्या समस्येने ग्रासले असल्याने त्याचे परिणाम मुख्यतः दुचाकीसाठीचे कर्ज वितरण आणि गृहकर्जाचे वितरण मंदावलेले आहे. बाजारपेठेतील गृहोपयोगी वस्तूने खरेदीसुद्धा मंदावलेली आहे. अनेक कंपन्या उधारीने, शून्य टक्के कर्जाच्या स्कीम, अनेक प्रकारांची सूट व सवलत देऊनसुद्धा बाजारातील व्यापारपेठा ग्राहकाअभावी चिंताग्रस्त झालेल्या आहेत.

अनेक प्रमुख शहरांत घरांच्या किमती उतरलेल्या असून काही ठिकाणी तर घरभाडय़ाइतके हप्ते द्या आणि घरांचे मालक व्हा अशा सवलती देऊनसुद्धा घरे विकली जात नाहीत असे अनेक बिल्डर लॉबीतून बोलले जात आहे. गेल्या 2010 ते 2015 मध्ये घराच्या किमती सरासरी 18 टक्के प्रतिवर्ष दराने वाढत होत्या त्या सरलेल्या आर्थिक वर्षात 7.5 टक्क्यांच्या वाढ दरावर आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मते आता किमतीतील वाढ सरासरी 5.3 टक्के अशी घसरली आहे. हीच बाब दुचाकी कर्ज वितरणाला, होम अप्लायन्सेसना आणि इतर वस्तू खरेदीला मारक ठरत आहे. अनेक बाजारपेठेतील व्यापारी वर्ग गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या पतपुरवठय़ावर अवलंबून आहे. रोख तरलतेअभावी या वित्तीय कंपन्या अडचणीत आल्याने व्यापारी वर्गातील उलाढाली मंदावल्या आहेत. त्यामुळे दीपावली सणात मंदीची लाट येईल, अशी भीती व चिंता व्यापारी वर्ग करीत आहे.

सेन्सेक्स कोसळत असल्याने प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण होत आहे. रोखीचा प्रवाह घटल्याने गैरबँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहस्थित कंपन्यांना दिलासा दिला जाईल आणि त्यांची रोकड तरलता वाढेल अशी व्यवस्था करून त्याबाबत काही निर्णय रिझर्व्ह बँक घेईल, अशी घोषणा गेल्या शुक्रवारी (19 ऑक्टो.) केली. त्यामुळे व्यापारउद्योग वाढेल अशी धारणा आहे.

देशाच्या बाजारपेठेतील मंदीच्या परिस्थितीचे अवलोकन करून रिझर्व्ह बँकेने बँकांना वाढीव कर्जपुरवठा करण्याची तयारी केली आहे. तसेच पायाभूत सोयीसुविधा क्षेत्राला वित्तपुरवठा करीत नसलेल्या प्रत्येक गैरबँकेला वित्तीय कंपनीत एकत्र कर्ज वितरणाची कमाल मर्यादा एकूण भांडवल निधीच्या सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. वित्तीय व्यवस्थेत तरतला कायम राहावी यासाठी रिझर्व्ह बँकेचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बाजारातील मंदीचा वेग कमी होईल.

जागतिक अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती ही सर्व देशांसाठी चिंतेचा विषय आहे. जागतिक बाजारात होत असलेली घसरण सर्व देशासाठी मारक असून या घडामोडीचा हिंदुस्थानला सर्वाधिक फटका बसत आहे असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले आहे. या परिस्थितीमुळे चिनी अर्थव्यवस्थेचा वेग नऊ वर्षांच्या निचांकाला पोहोचला आहे. त्याचा विकासदर 6.5 टक्क्यांवर घसरला आहे. त्या तुलनेत हिंदुस्थानी अर्थव्यवस्था बरी आहे.

या देशातील पाणी आणि शेती या निसर्गावर आणि खनिज तेलासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणावर अवलंबून असल्याने हिंदुस्थानी बाजारपेठा दोन मुद्यांवरच नफा-तोटय़ाचे गणित करीत असल्याने व्यवहारात तेजी/मंदीची लाट आली तरीदेखील ग्राहक व व्यापारी वर्गाचे मेतकुट नेहमीच जमत असल्याने या अवघड परिस्थितीतून दोघेही निभावून जातील असा नियतीचा संकेत आहे. तो अंदाज तरी खरा ठरावा.

बाजारातील मंदीमुळे शेअर बाजाराला मंदीचा जबरदस्त विळखा बसल्याने सलग चौथ्या घसरणीने सेन्सेक्स 34 हजारांखाली आला आहे. या घसरणीमुळे सेन्सेक्स गेल्या सहा महिन्यांचा तळ अनुभवू लागला.

देशभरातून आजमितीस जवळपास 15 ते 20 कोटी मध्यमवर्गीय व छोटे-मोठे लहान सामान्य वर्गातील टपरीवाले लोकसुद्धा दसरा-दिवाळी दरम्यान चार पैसे व्यापारातून मिळतील या आशेने कर्ज काढून आपापल्या व्यवसायात भांडवल गुंतवून दुकानात माल भरत असतात, परंतु यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती आणि खूप मोठय़ा प्रमाणात होत असलेली ऑनलाइन खरेदी-विक्री आणि स्थानिक ठिकाणी असलेले विविध मॉल्स, सुपर डुपर विक्री करणारे सुपर मार्केटमुळे कोटय़वधी सामान्य व्यापारी वर्गाचे मात्र गिऱहाईक नाही म्हणून वैतागलेला असून व्यापारधंदा घटल्याने सामान्य व्यापारी चिंतातुर झाला असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

ग्राहकवर्ग ऑनलाइन किंवा मॉल्सकडे खरेदीसाठी वळल्याने छोटे-मोठे व्यापारी हतबल झालेले असून हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? अशाने व्यापारीवर्गाचा व्यवसाय ठप्प होत आहे. मार्जिन कमी झाल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. दुकानाचे भाडे, वाढते लाइटबिल, विविध प्रकारचे कर आणि त्यात भर म्हणजे गल्लीबोळातील उत्सवाच्या विविध वर्गण्या यामुळे व्यापारी वैतागला आहे. या सणासुदीच्या तोंडावर व्यापारी चिंतातुर झालेला आहे व त्यात वाढती महागाई आणि दुष्काळी परिस्थिती त्यामुळे दिवाळीवर मंदीचे सावट येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. छोटय़ा व्यापारीवर्गाकडे धंदा नसल्याने व्यवहारात-बाजारात रोख उलाढाल ठप्प झाल्याने पैशाची चणचण सर्वत्र भासत आहे.