
सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्या जाळण्याचे सत्र सुरूच आहे. पिंपरीच्या मिलिंदनगरमधे एका इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या गाड्या समाजकंटकांनी पेटवून दिल्या आहेत. येथील कपिला वास्तू या इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या 6 गाड्या समाज कंटकांनी पेटवल्या असून, आग विझवताना 4 महिला जखमी झाल्या आहेत. समाजकंटकांच्या उच्छादामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरीच्या मिलिंदनगर भागात कपिला वास्तू या इमारतीमध्ये पार्क केलेल्या 6 गाड्या अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास पेटवून दिल्या आहेत. यामध्ये चार मोटारसायकल आणि 2 मोपेड जळून खाक झाल्या असून काही घरांचे नुकसान झाले आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात 4 महिला देखील जखमी झाल्या आहेत. ही आग कोणी लावली आणि त्याच्यामागचे कारण काय याचा तपास पिंपरी पोलीस घेत आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात यापूर्वी देखील गाड्या जाळणे, तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या समाजकंटकांना आवर घालण्याची मागणी होत आहे.


























































