अज्ञात व्यक्तीकडून ट्रान्सफॉर्मर  बंद, नागरिकांची गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

शहरातील ग्रामीण रुग्णालयानजीकचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात व्यक्ती गेले चार दिवस बंद करत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अपघात, चोरी यांसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी. अशी मागणी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह प्रभाग तीनमधील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस शवविच्छेदन कक्षालगत असलेल्या ट्रान्सफार्मर अज्ञात व्यक्ती गेले चार दिवस बंद करत असल्याने चिवला बीच परिसरातील भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील स्ट्रीटलाईट बंद असल्यामुळे चोरीच्या घटना तसेच अपघातही घडू शकतात. अज्ञात व्यक्ती गेले चार दिवस सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करत आहे. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा फ्यूज लावला जात आहे.

याबाबत वीज वितरणकडे तक्रार केली आहे. त्यांनी ट्रान्सफॉर्मर व वीज वाहिन्यांची पाहणी केली असता त्यात त्यांना कोणताही बिघाड आढळला नाही. मात्र ट्रान्सफार्मरमधील फ्यूज अज्ञात व्यक्ती बाजूला काढून ठेवला जात असल्याचे दिसून आले. वीज खंडित झाल्याने कन्याशाळा, रोझरी स्कुल, चिवला बीच व सेवांगण या परिसरातील नागरिकांना याचा फटका बसला आहे. याबाबत पालिका हद्दीत अज्ञाताकडून सुरू असलेल्या गैरप्रकार रोखण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.