
सामना प्रतिनिधी, नाशिक
दिवाळी सणानिमित्त नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध घेणाऱ्या चोखंदळ नाशिककरांना यंदा लोकर व कॅनव्हासच्या आकर्षक आकाशकंदिलांनी भुरळ घातली आहे. विशाल करंजकर यांनी लोकरीचे, तर राम गव्हाणे यांनी कॅन्व्हॉसचे आकाशकंदील तयार केले आहेत. पहिल्यांदाच बाजारपेठेत दाखल झालेल्या या आकाशकंदिलांच्या किंमतीही 350 रुपयांपर्यंतच असल्याने मागणीही चांगली आहे.
इकोफ्रेन्डली आकाशकंदील
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असल्याने आकाशकंदिलांना मोठे महत्त्व आहे. घर व परिसर आकाशकंदील व पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. दिवाळीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कागदी, कापडी व बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील उपलब्ध आहेत. मात्र, इकोफ्रेन्डली असे लोकर आणि कॅन्व्हॉसचे नव्या प्रकारचे आकाशकंदील आकर्षणाचे केंद्र आहेत.
मेनरोड येथील चित्रमंदिरमागील गल्लीत वरद आर्टस्च्या विशाल व विक्रांत करंजकर या भावंडांनी लोकरीपासून सुंदर आकाशकंदील तयार केले आहेत. आत्या स्वेटर विणते हे पाहून त्यांना लोकरीच्या आकाशकंदीलांची कल्पना सुचली. त्यांनी वर्तुळाकार, लंबगोलाकार, चौकोनी अशा विविध आकारांमध्ये हे आकाशकंदील तयार केले आहेत. त्यांच्या किंमतीही अगदी कमी म्हणजे 100 रुपयांपासून 300 रुपयांच्या घरात आहेत. पहिलेच वर्ष असल्याने त्यांनी 1500 आकाशकंदील तयार केले, त्याला नाशिक, मुंबई, पुण्यात चांगली पसंती मिळाली, अशी माहिती विशाल करंजकर यांनी दिली.
शालिमार-मेनरोड रस्त्यावर राम गव्हाणे यांच्या दुकानात कॅन्व्हॉसचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. गव्हाणे यांनीच कलात्मकपणे कॅन्व्हॉसचा वापर केला आहे. पिवळ्या आणि केशरी रंगात रंगविलेल्या कॅन्व्हॉसच्या आकाशकंदिलांवर श्री विठ्ठल, श्रीकृष्ण, गाय, मोर, राजमुद्रा अशा प्रतिमा छापलेल्या आहेत. त्यांची किंमत 300 ते 350 रुपयांपर्यंत आहे. हेही आकाशकंदील नाशिककरांच्या पसंतीस उतरले आहेत.
summary- woolen and fabric lanterns are catching eyeballs























































