सरकार गेले तेल लावत, राममंदिर झालेच पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या’चा नारा दिल्यानंतर राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. राजधानीतील धर्मादेश परिषदेत तर अखिल भारतीय संत समितीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला थेट इशाराच दिला.

‘तुमचे सरकार गेले तेल लावत, सरकार राहील किंवा जाईल त्याचे आम्हाला काही देणेघेणे नाही, मात्र राममंदिर झालेच पाहिजे. त्यासाठी 6 डिसेंबरपूर्वीच हालचाली करा’. उद्धव ठाकरे यांनी देशभरातील कोटय़वधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या राममंदिर निर्माणासाठी पुढाकार घेतल्यानंतर राजकीय आणि धार्मिक पातळीवर प्रचंड उलथापालथ होत आहे. राममंदिराच्या निर्माणाबाबत संघाने मोदी सरकारला नुकत्याच कानपिचक्या दिल्या होत्या. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने पाठिंबा दर्शविल्यानंतर अखिल भारतीय संत समितीच्या वतीने राजधानीच्या तालकटोरा स्टेडियमवर दोनदिवसीय धर्मादेश परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभरातील तीन हजारांहून अधिक संतांनी भाग घेतला होता. काल कारसेवकांना श्रद्धांजली वाहून देशातील वाढत्या धर्मांतराबाबत या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.

आजच्या सत्रात मात्र देशभरातील संतमंहंतांनी राममंदिर निर्माण झालेच पाहिजे. आम्हाला दुसरे काहीही ऐकायचे नाही असा ठराव या संत समितीने एकमुखाने मंजूर केला. तत्पूर्वी सकाळी या धर्मादेश बैठकीला संबोधित करताना रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख रामनिवास वेदांती यांनी राममंदिर निर्माणासाठी कोणत्याही अध्यादेशाची गरज नसल्याचे सांगत डिसेंबरपासून राममंदिर निर्माणाचे काम होईल. समझोत्याने हे काम केले जाईल. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जाईल असे स्पष्ट केले.

वेदांती यांच्यापेक्षा जगत्गुरू रामभद्राचार्य यांनी राममंदिरावर रोखठोक भूमिका मांडत मोदी सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले. मोदी सरकार राहील की जाईल याची चिंता आम्ही करत नाही. सरकार गेले तेल लावत, आम्हाला फक्त आणि फक्त राममंदिर हवे आहे. त्यासाठी 6 डिसेंबरपूर्वी एक तर समझोता करा किंवा थेट राममंदिर निर्माणाचा अध्यादेशच काढा अशी सडेतोड भूमिका रामभद्राचार्य यांनी मांडली. राममंदिराबाबत कोर्टाने अनेकदा कुकर्म केले आहे. कोर्टाने जे केले तेच तुम्ही पण करणार काय, असा खडा सवाल रामभद्राचार्य यांनी सरकारला केला.

6 डिसेंबरपूर्वी निर्णय घ्या, सरकारला डेडलाइन
दिवाळीत रामाच्या नावाने दिवे लावा
देशवासीयांनी 6 नोव्हेंबर रोजी प्रभू रामाच्या नाकाने घरात दिवे लावावेत. दिवाळीनंतर लगेचच राममंदिराचं काम सुरू करू, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
राममंदिर निर्माण ही जनतेची इच्छा
राममंदिर निर्माण व्हावे ही देशातील जनतेची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हायला हवी असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी यावेळी मांडले. दोन्ही बाजूंमध्ये समझोत्याचे प्रयत्न व्हावेत. समझोत्यानुसार राममंदिर झाले तर चांगलेच आहे. अध्यादेश हा त्या बाबतीत शेवटचा पर्याय ठरेल, असेही रविशंकर यावेळी म्हणाले. यावेळी साध्वी प्राची व हंसदेवाचार्य यांनीही आपले विचार मांडले.

summary- saints got aggressive over ram mandir