
सामना प्रतिनिधी, पुणे
‘सीपीआय माओवादी’ या बंदी घातलेल्या संघटनेची भूमिका घेऊन शनिवारवाडा येथे ‘एल्गार परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वक्त्यांनी केलेली भाषणे ही वर्गकलह निर्माण करणारी होती. तसेच कार्यक्रमांचे सादरीकरण प्रक्षोभक होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल होऊन गंभीर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असे प्रतिज्ञापत्र पुणे पोलिसांनी भीमा- कोरेगाव चौकशी आयोगासमोर सादर केले आहे. पुणे शहर पोलिसांच्या वतीने अतिरिक्त पोलीस आयुक्त रकींद्र सेनगावकर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
भीमा-कोरेगाव येथील लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी ‘एल्गार परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी भीमा- कोरेगाव येथे दंगल झाली. यात जाळपोळ, दगडफेकीची घटना घडल्याने यात एकजण ठार झाला होता. या घटनेचे राज्यभरात प्रचंड प्रतिसाद उमटले होते. 3 जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी आयोग नियुक्त केला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल आणि माजी राज्य सचिव सुमित मुलिक यांचा चौकशी आयोगात समावेश आहे. ‘एल्गार परिषदे’तील चिथावणीखोर भाषणे आणि परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा सहभाग असल्याची तक्रार आल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याचा तपास पोलिसांनी करीत देशभरातील टॉपच्या माओवाद्यांना अटक केली आहे. त्याचा तपास अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या प्रतिज्ञापत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.
summary- Elgar speeches caused bheema korgaon prob says pune police

























































