
सामना प्रतिनिधी । नगर
वाकोडी गावाजवळ मनपा हद्दीतील नियोजित कत्तलखाण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या बाबत अनेक संघटनांनी विरोध केला आहे. नगर ही साधू-संतांची भूमी असून मोठा ऐतिहासिक वारसा आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे राष्ट्रसंत जैन आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांची कर्मभूमी आणि त्यांचे समाधीस्थळ “आनंदधाम” हे देशभरात आता तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे सर्व पाहता वाकोडी येथे होणारे कत्तलखानाचा विरोध जैन समाजाने केला असून त्यास शिवसेनेनेही विरोध करून पाठींबा देत लेखी पत्र संस्कार भारती वाणी भुषण पूज्य साध्वी प्रीतीसुधाजी यांना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी दिले. याप्रसंगी साध्वी मधूस्मिताजी, साध्वी प्रेरणाश्रीजी, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, मेहुल भंडारी, शैलेश गांधी, कांतीलाल गांधी, संतोष करनावट, राजेंद्र गांधी, नयन चंगेडिया, अभिषेक भोसले, डॉ.अभय मुथ्था, फुलचंद गांधी, गिरीष जाधव, संतोष गांधी उपस्थित होते.
नगर महानगरपालिकेच्या वाकोडी येथील नियोजित कत्तलखान्यास शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेने नगर शहरात गेली २५ ते ३० वर्ष समाजसेवेची अनेक भक्कम कामे केली आहेत. हे सर्व जैन गुरुजनांच्या मार्गदर्शनाशिवाय तसेच जैन समाजाच्या जागृत घटकांशिवाय करणे अत्यंत कठीण होते. जैन समाजाची बेजोड साथ मिळाल्यानेच समाजसेवेची विधायक कामे शहरात शिवसेनेला करता आली, यात तिळमात्र शंका नाही. असे असतांना शहराच्या शिवे पलीकडे मौजे वाकोडी येथे कत्तलखाना उभारणीचा विषय समोर आल्याने शिवसैनिक अत्यंत अस्वथ झाले असल्याने नियोजित कत्तलखान्याला शिवसेनेचा कडाडून विरोध असल्याचे पत्रात म्हटले आहे.

































































