
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची रविवारी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात नियमित तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पर्रीकर दोनापावला येथील आपल्या खाजगी निवासस्थानी परतले आहेत. सप्टेंबरमध्ये पर्रीकर यांना दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे 29 दिवस उपचार घेऊन मुख्यमंत्री गोव्यात परतल्यापासून दोनापावला येथील आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.
एम्समधून बाहेर आल्यापासून त्यांच्या प्रकृतीबाबत तर्कविर्तक सुरू होते. काँग्रेसने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत व्हिडिओ पुरावे आणि मेडिकल बुलेटिन जारी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पर्रीकर यांनी सलग तीन दिवस बैठका घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले होते. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि मंत्रीमंडळाच्या बैठकीचे फोटो अधिकृतरित्या जारी करून मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी हळूहळू काम सुरु केल्याचे दाखवून देत काँग्रेसच्या विरोधाची धार कमी करण्याचा पर्यंत करण्यात आला होता. गेले काही दिवस पर्रिकर यांना रविवारी सकाळी नियमित तपासणीसाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी पूर्ण होताच त्यांना घरी पाठवण्यात आले,अशी माहीती मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव रूपेश कामत यांनी दिली आहे.



























































