कयाधुच्या आडुन हिंगोली जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
तानाजी मुटकुळे व रामरतन शिंदे जवळेकर

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील भाजप नेते रामरतन शिंदे जवळेकर आणि भाजपा आमदार तथा जिल्हाध्यक्ष तानाजी मुटकुळे या दोघांमधील गटबाजीला चांगलीच धार चढली असुन दोघांमध्ये पाठ शिवणीचा खेळ सुरु झाला आहे. शिंदेंनी शासन दरबारी मागणी आणि उपक्रम हाती घेतला की, आमदार मुटकुळेंकडुन प्रति मागणी करण्याचा सिलसिला सुरु आहे. आमदार मुटकुळेंना शिंदे यांनी चांगलेच जेरीस आणले आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या भाजपामध्ये जिल्हाध्यक्ष तथा आमदार तानाजी मुटकुळे आणि युवानेते रामरतन शिंदे जवळेकर असे उघड दोन गट सक्रिय झाले आहेत. शिंदे यांच्या पाठी मागे पालकमंत्र्यांनी ताकद उभी केली आहे. तर मुटकुळे हे देखील आमदारकीच्या माध्यमातुन ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीचे ग्रहण भाजपाला लागले असुन मोजक्या मंडळींच्या कोंडावळ्यात राहण्याचे प्रकार जिल्हा नेतृत्वाकडून होत असल्याने गटबाजीला सुरुवात झाली. रामरतन शिंदे यांनी जुन्या व नाराज नवोदीत कार्यकर्त्यांना एकत्र आणून सेनगाव व हिंगोली तालुक्यात संपर्क वाढवत विधानसभेची तयारी चालविली आहे. शिंदे यांनी जवळ्यात किर्तनाचा मोठा कार्यक्रम घेतल्यावर मुटकुळे यांनीही हिंगोलीत राम कथा सोहळा घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विद्युत रोहित्राची मागणी आधी शिंदेंनी केली. त्यानंतर मुंबईत जाऊन मुटकुळे यांनीही उर्जामंत्र्यांची भेट घेत विद्युत रोहित्र व वीजेचे प्रश्न मांडले.

हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधु नदीच्या पुनर्रुज्जीवनासाठी रामरतन शिंदे यांनी नदीकाठच्या ४७ गावात संपर्क करुन जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. श्रमदानासाठी तयार होऊन शेती व जीवन समृध्द करण्यासाठी कयाधुचे पुर्नरुजीवन आवश्यक असल्याचे शिंदे ठिकठिकाणी पटवुन देत आहेत. आजवर ३० च्यावर गावामधील नागरिक श्रमदानासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आमदार मुटकुळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कयाधुचा प्रश्न मांडला. तसेच कयाधु नदीपात्रातुन मुरुम काढण्यासाठी व नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरणासाठी मुटकुळेंनी प्रयत्न केले. या दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन असा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला आहे. यामुळे भाजपातील गटबाजी वाढत असल्याचे दिसून येते.