
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
संसद परिसरात माकडांच्या टोळय़ांनी उच्छाद मांडला आहे. हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या माकडांशी नजर भिडवू नका, असे फर्मान लोकसभा सचिवालयाने काढले आहे. माकड रस्त्यावर असेल तर रस्ताही ओलांडू नका, असा इशाराही देण्यात आला आहे.
संसद परिसरात सध्या माकडांच्या टोळय़ांनी उच्छाद मांडला आहे. राष्ट्रपती भवन, नॉर्थ व साऊथ ब्लॉक, संसद भवन तसेच या परिसरातील इमारतींवर ही माकडे मुक्कामी आहेत. त्यातच हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने माकडांचा बंदोबस्त कसा करावा ही चिंता सचिवालयाला सतावत आहे.
किती माकडे, माहिती नाही
माकडांच्या उच्छादाने दिल्लीकर हैराण झाले आहेत. माकडे घरात घुसतात, खाण्याचे पदार्थ पळवतात. माणसांवर हल्ला करतात. राजधानीत किती माकडे आहेत याचा अधिकृत आकडा वन विभागाकडेही उपलब्ध नाही. मात्र अनधिकृत माहितीनुसार किमान 40 हजार माकडे आहेत. मंगळवार व शनिवारी दिल्लीकर माकडांना भोजन देतात त्यामुळेच ही माकडे शेफारल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
माकडाने खो-खो केले तरी…
आज सचिवालयाने चक्क एक फर्मान काढले असून त्यात माकडांशी नजर मिळवू नका, अशी सूचना करण्यात आली आहे. माकड रस्त्यावर असेल तर रस्ताही ओलांडू नका. माकड तुमच्या गाडीसमोर आले किंवा खो-खो केले तरी घाबरू नका, गाडी समोर काढा, असा सल्लाही सचिवालयाने दिला आहे. माकड फारच त्रास देत असेल तर जमिनीवर काठी आपटा, असेही सचिवालयाने म्हटले आहे.




























































