सामना प्रतिनिधी । लांजा
आगवे येथील युवकांच्या बचत खात्यातील दोन दिवसात इंटरनेट बँकिंगचा वापर करत ९ हजार रूपये काडून फसगत झालेल्या तरूणांने पोलीस स्थानकात धाव घेऊन या अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.
आगवे मोरेवाडी येथील गणेश महादेव गुरव ( वय – १९ ) हा मुंबई येथे काम करतो त्याचे बचत खाते एसबीआय बँक शाखा लांजा येथे आहे. ऑगस्ट महिन्यात त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल वर फोन करून ” मी एसबीआय बँकेतून बोलतो आहे. तुझा एटीएम नंबर दे , एटीएम नंबर दिल्यानंतर ओटीपी नंबर दे ” त्यानुसार गणेश यांनी माहिती दिली होती. त्यानंतर या अज्ञात व्यक्तीने दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बनावट एटीएमचा वापर करून ३ हजार रूपये काढले पैसे काढण्यात आल्याचा मेसेज गणेश यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांने आपले एटीएम बंद केले होते.
शुक्रवारी दुपारी २.४६ वाजता इंटरनेट बँकिंगचा वापर करत ५ हजार रुपये काढले. एटीएम कार्ड बंद केले असताना पुन्हा पैसे काढल्याने तो आश्चर्य चक्कीत झाला. मुंबईहून आपल्या गावी येण्याचा निर्णय घेतला व शुक्रवारी रात्री तो गावी येण्यासाठी निघाला. शनिवारी सकाळी ६.२७ वा. पुन्हा ४ हजार रुपये बँकेतून काढले गेले. पुन्हा ६.४३ वा. १० रुपये काढल्याचा मेसेज आला. दोन दिवसात तब्बल ९ हजार १० रुपये या अज्ञात व्यक्तीने काढल्याने संपूर्ण खाते रिकामी झाले. गणेशने सकाळी तडक बँक गाठली बँकेत गेल्यानंतर माहिती घेतली असता हा इंटरनेट बँकिंगचा वापर करून पैसे काढले गेल्याचे गणेश याला सांगण्यात आले. त्यानंतर गणेश गुरव याने लांजा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास गावडे हे करीत आहेत.
























































