ओला-उबेर चालक-मालक पुन्हा संपावर, सोमवारी विधान भवनावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ola-uber-protest

सामना प्रतिनिधी । मुंबई

सरकारने 13 मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आणि दिवाळी उलटूनही याबाबत कुठलाच निर्णय न घेतल्याने ओला, उबेरचे मालक-चालक संतप्त झाले आहेत. विविध मागण्यांसाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला, उबेर चालक आणि मालक शनिवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले असून सोमवारी विधान भवनावर धडक मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ओला, उबेर चालक आणि मालकांनी दिवाळीपूर्वी सलग 12 दिवस संप पुकारला होता, मात्र ऐन दिवाळीत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत 15 नोव्हेंबरपर्यंत ओला, उबेर चालक– मालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे हा संप तात्पुरता मागे घेण्यात आला होता. परंतु दिवाळीची मुदत संपल्यानंतरही सरकारने आपल्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्याने अखेर ओला, उबेर चालक-मालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे, अशी माहिती मराठी कामगार सेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटरचे भाडे 16 रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटरचे भाडे 18 रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान 100 ते 150 रुपये भाडे निश्चित करण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या होत्या. दिवसाला किमान तीन हजार रुपये व्यवसाय व्हायला हवा असे कॅब चालक आणि मालकांचे म्हणणे आहे.

कुठून निघणार मोर्चा
सोमवारी सकाळी 10 वाजता ‘भारतमाता’वरून हा मोर्चा निघणार असून तो थेट विधान भवनावर धडकणार आहे.