
>> नीलेश कुलकर्णी
भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण होऊ न दिल्यास विरोधकांच्या विजयाचा ‘कर्नाटकी कशिदा’ विणता येऊ शकतो हे कर्नाटकातील पोटनिवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले. सत्तेत आल्यापासून पोटनिवडणुकांमध्ये ‘पराभवाची माती’ खाण्याची परंपरा केंद्रातील सत्ताधारी पक्षाने कर्नाटकातही अखंड ठेवली. वास्तविक अवघ्या सहा महिन्यांसाठी खासदार होण्याची कर्नाटकात कोणालाही फारशी इच्छा नव्हती, मात्र येडियुरप्पांचा विरोध डावलून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम लादला. त्यात भाजप उताणा पडला. त्याहीपेक्षा ज्या मतांच्या फरकाने भाजपचा पराभव झाला तो विरोधकांच्या महागठबंधनच्या हेलकावे खाणार्या गलबताला आधार देणारा आहे. कारण कर्नाटकात जे घडू शकते ते देशात घडेल का? हाच खरा प्रश्न आहे.
कर्नाटकातील शिमोगातून 2014मध्ये तब्बल साडेतीन लाख मतांनी जिंकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे चिरंजीव राघवेंद्र 2018च्या पोटनिवडणुकीत जेमतेम 50 हजारांनी निवडून आले. थोडक्यात अवघ्या चार वर्षांत वडिलांचा हा बालेकिल्ला जिंकता जिंकता त्यांच्या तोंडाला फेस आला. कशीबशी निवडणूक जिंकून येडियुरप्पा चिरंजीव राघवेंद्र लोकसभेत पोहचले. मात्र बेल्लारीतील मोठे खाणसम्राट श्रीरामुलू यांना मात्र आपल्या भगिनीला निवडून आणता आले नाही. श्रीरामुलू यांना कर्नाटकात उपमुख्यमंत्री व्हायचे असल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीत भगिनी शांताबाई यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी बेल्लारीच्या खाणीतून पैशांचा धूर काढला. तरीही त्यांच्या भगिनीला जनतेने तब्बल अडीच लाख मतांनी नाकारले. कर्नाटकातील या पोटनिवडणुकीत भाजप आणि सत्ताधारी काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यातील मतांच्या टक्केवारीतील अंतर 25 टक्क्यांपेक्षाही जास्त राहिली हे लक्षात घेण्यासारखे आहे.
काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूरच्या पोटनिवडणुकांनी देशातील जनमानस मोदी सरकारविरोधात असल्याचा कौल दिला होता. कर्नाटकातील कुमारस्वामींच्या मुख्यमंत्री होण्याने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र त्यावेळी कुमारस्वामींचा शपथविधी सोहळा म्हणजे विरोधकांच्या महागठबंधनाच्या ‘बारशा’चाच कार्यक्रम ठरला होता. यावेळी सर्वपक्षीय विरोधकांनी हात वगैरे वर करून एकीचा संदेशही दिला. तथापि महागठबंधनाच्या ऐक्याचे मोतीचूर लाडू कर्नाटकाबाहेर जायला आणि राजकीय धुरिणांच्या गळी उतरायला तयार नाहीत. उत्तर प्रदेशातील मायावती व अखिलेश या आत्या-भाच्यांमध्ये अजूनही बेबनाव आहे तर बिहारमध्ये रुग्णशय्येवर असलेल्या लालूंशी आघाडी करण्याबाबत काँग्रेसने कोणतीच पावले टाकलेली नाहीत. नाही म्हणायला आंध्रमध्ये चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एल्गार पुकारल्याने काँग्रेसने त्यांच्या तेलगू देसमला तात्पुरते बाहुपाशात घेतल्याचे चित्र आहे. मात्र हा प्रेमालाप किती काळ टिकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्नाटकात जे घडू शकते ते देशभरात का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. महागठबंधनमधील पंतप्रधानपदाच्या ‘बाशिंगधार्यां’नी आपापसातील मतभेदांचे आणि इगोचे गाठोडे गंगार्पण केले तरच या महागठबंधनला अर्थ उरणार आहे. देवेगौडा आणि सिद्धरामय्या या एकेकाळच्या गुरू-शिष्यांनी परस्परांतील मतभेद विसरून विरोधकांच्या ‘कर्नाटकी विजयाचा काशिदा’ शिवला आहे. महागठबंधनचे मुखंड यापासून बोध घेतील काय?
मुख्यमंत्र्यांची ‘त्रिमूर्ती अडचणीत
राजस्थान, छत्तीसगढ व मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. लोकसभा निवडणुकीची ‘सेमिफायनल’ म्हणून त्याकडे पाहिले जात असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीने लढवल्या जात आहेत. तेथे कोणाचा झेंडा फडकेल हे यथावकाश कळेलच, मात्र तिन्ही राज्यांत ज्यांच्यावर पक्षाच्या विजयाची धुरा आहे ते तीनही विद्यमान मुख्यमंत्री ‘डेंजर झोन’ मध्ये आहेत. मध्य प्रदेशसारखे एकेकाळचे बिमारू राज्य दणदणीतपणे चालविणार्या शिवराजसिंग चौहान यांची बुधनी या त्यांच्या बालेकिल्ल्यात कसोटी लागली आहे. माजी उपमुख्यमंत्री असलेल्या सुभाष यादवांचे चिरंजीव व माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांना काँग्रेसने तिथे निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शिवराजमामा सध्या घाम पुसत असल्याचे चित्र आहे. सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज यांचा यावेळी ‘मामा’ करण्यासाठी ‘एक यंत्रणा’ कामाला लागल्याची चर्चा आहे.
जी बाब शिवराज चौहान यांची तीच छत्तीसगडमध्ये ‘चावलवाले बाबा’ असलेल्या रमणसिंग यांची. राजनंदगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला काँग्रेसतर्फे उभ्या आहेत. त्यांनी रमणसिंग यांना मतदारसंघातच अडकवून ठेवले आहे. दुसरीकडे रमणसिंग यांच्या ‘पाडावा’ची योजनाही तयार असल्याचे भाजपमध्येच बोलले जाते. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यातून विस्तव जात नाही. त्यातच वसुंधराजे यांच्यासमोर झालरापाटणमधून काँग्रेसने भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांचे चिरंजीव मानवेंद्रसिंग यांना रिंगणात उतरवल्याने वसुंधरा यांचे ‘तारे जमी पर’ आले आहेत. भाजपच्या तिन्ही मातब्बर मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसने हेविवेट उमेदवार उतरविल्याने या मुकाबल्यांकडे देशाचे लक्ष आहे. काँग्रेसचे हे उमेदवार भाजप नेतृत्वासाठी ‘पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारण्याच्या’ योग्यतेचे ठरतात की दिल्लीश्वरांचा ‘मिशन निपटो’ यशस्वी ठरते ते आता बघायचे.
अनंतकुमारांची अकाली ‘एक्झिट’
व्यंकय्या नायडूंच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने ज्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी यशस्वी पार पाडत असतानाच अनंतकुमारांचे कॅन्सरमुळे अकाली जाणे सर्वांसाठीच वेदनादायक ठरले. विशेषतः संसदेच्या गेल्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीच्या पत्रकार परिषेदत आत्मविश्वासाने उत्तर देणार्या अनंतकुमारांच्या चेहर्यावर मोदी सरकारने विश्वासमत जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र त्यावेळी नेहमीच हसतमुख राहणारे अनंतकुमार पुढील अधिवेशनात दिसणार नाहीत याची कोणी कल्पना तरी केली होती काय? मात्र फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अनंतकुमारांची मृत्यूशी झुंज सुरू झाली आणि काही महिन्यांतच ती आटोपली.
अनंतकुमारांवर कर्करोगाने मात केली. दुर्दैव असे की, कॅन्सरसारख्या विकाराने गोरगरीबांचा पैशांअभावी मृत्यू होऊ नये यासाठी मंत्री असताना अनंतकुमार अहर्निश झटले. बंगळुरूमध्ये रेल्वे कॉलनीत मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असताना अनंतकुमारांनी कॅन्सरशी झुंज देणार्या आपल्या आईचे दुःख आणि वडिलांची आर्थिक विवंचनेपोटी होणारी वेदना पाहिली होती. डॉक्टरांनी सुचविलेल्या दोन गोळ्या आईला देणे वडिलांना पैशांअभावी शक्य झाले नव्हते. केवळ एकाच गोळीवर आईचे उपचार करून उरलेल्या पैशांत संसार सांभाळलेल्या असहाय पित्याची धडपड अनंतकुमारांनी पाहिली. त्यामुळे आपल्या आईसारखी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी जेनरिक मेडिसीनच्या माध्यमातून गोरगरीबांना स्वस्तातील उपचार देण्यासाठी झटणार्या अनंतकुमारांना कॅन्सरनेच मृत्यू यावा हे दुर्दैवच! जिंदादिल प्रशासक म्हणून लोकसभेत कानडीमिश्रित हिंदी बोलत हास्याची कारंजी उडविणारे अनंतकुमार कायमच स्मरणात राहतील.































































