लेख : हिंद महिला समाजाचा शतक महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुमेधा कोकजे (विश्वस्त, हिंद महिला समाज)

स्वातंत्र्यपूर्व  काळात 28 नोव्हेंबर 1918 रोजी स्थापन झालेली हिंद महिला समाज संस्था म्हणजे कै. अवंतिकाबाई गोखले यांच्या दूरदृष्टीचा व सामाजिक जाणिवेचा पुरावाच होय.

महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या अवंतिकाबाई गोखले यांनी ऑपेरा हाऊस येथील त्यांच्या राहत्या जागेत या संस्थेची स्थापना केली.

ज्या काळात स्त्र्ाया विशेष बाहेर जात-येत नसत व त्या मानाने शैक्षणिकदृष्टय़ाही प्रगत नव्हत्या, अशा काळात स्त्र्ायांनी वाचावे, लिहावे व हळूहळू स्वतंत्र व्हावे या विचाराने त्यांना झपाटले होते. संसाराची दोन्ही चाके सक्षम व्हावीत या गांधीजींच्या विचाराला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केला.

समाजाच्या स्थापनेनंतर 100 वर्षांच्या काळात संस्थेने अनेक उपक्रम राबविले व कालमानानुसार त्यात बदलही करण्यात आले. सुरुवातीच्या काळात कस्तुरबा गांधी ग्रंथालय, इंग्रजी व हिंदीचे वर्ग, शिवणवर्ग, पाकशास्त्राचे वर्ग, प्रथमोपचाराचे शिक्षण, वधू-वर सूचक मंडळ चालविले. अलीकडच्या काळात उद्योग विभाग सुरू करून त्यात पोळी-भाजी तसेच इतर पदार्थ (शेव, चिवडा, चकली, शंकरपाळे, सर्व प्रकारचे लाडू वगैरे) तयार केले जातात. हे पदार्थ बाराही महिने मिळतात. समाजाच्या पुरणपोळय़ांना खूप मागणी असते. काही लोक हे पदार्थ आपल्या परदेशी नातेवाईकांना व मित्रमंडळींना पाठवीत असतात.

याखेरीज नोकरी करणाऱ्या जोडप्यांच्या मुलांसाठी शिशुधामही चालविले जाते. वर्षभरात अनेक कार्यक्रम संस्थेतर्फे आयोजित केले जातात. आजमितीस संस्थेचे हजाराहून अधिक सभासद आहेत.

आजवर संस्थेला अनेक प्रामाणिक व कर्तव्यतत्पर कार्यकर्ते (विनावेतन) तसेच सक्षम व मेहनती सेवकवर्ग लाभल्यामुळेच 100 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण झाली आहे.

संस्थेला भेट देणाऱ्या काही थोर मंडळींची नावे बरेच काही सांगून जातात. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, शंकराचार्य कूर्तकोटी, काकासाहेब खाडिलकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, राजगोपालाचारी, धोंडो केशव कर्वे…

हिंद महिला समाजाविषयी लिहिताना अवंतिकाबाई गोखले यांच्याविषयी थोडक्यात माहिती देणे अपरिहार्य ठरते.

समाजातील स्त्रियांची दुःखे व प्रश्न समजून घेऊन व त्यासाठी धडपड करून ते प्रश्न सोडविणे हीच त्यांची अखेरपर्यंतची तळमळ होती. गांधीजींनी त्यांना शिष्या मानले व लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राची सरोजिनी नायडू म्हणून गौरविले.

साक्षरता प्रसारासाठी त्या स्वतः छोटय़ा मोठय़ा वस्त्यांमधून हिंडत व स्त्र्ायांना लिहिण्यावाचण्यासाठी प्रवृत्त करीत. त्या स्वतः एक प्रशिक्षित नर्स होत्या व अनेक रुग्णांची सेवासुश्रूषा त्यांनी केल्याची नोंद आहे. त्यांच्या संस्थेत कामाला येणाऱ्या स्त्रियांसाठी वक्तशीरपणाची सवय त्यांनी लावली. मुख्य म्हणजे ज्या वेळात स्त्रिया मोकळय़ा असतात (दुपारी 3 ते 6) या वेळेतच समाजाचे कामकाज आजही चालते.

अवंतिकाबाई काही काळ मुंबई महानगरपालिकेत नगरसेविकाही होत्या. म. गांधींबरोबर मिठाच्या सत्याग्रहात त्या सामील झाल्या होत्या. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाल्यामुळे त्यांनी तुरुंगवासही भोगला.

काळाच्या ओघात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित झालेल्या स्त्राr कार्यकर्त्यांची एक फळीच तयार झाली. त्यातील काही नावे अशी – गंगाबाई गोखले, इंदुमती सरदेसाई, सावित्रीबाई कानिटकर, कृष्णाबाई कलगुटकर, कमलिनीबाई गोखले, शैलाताई पेंडसे, वनश्रीबाई तुळझापूरकर, मनोरमाबाई आपटे आदी. त्याशिवायही अनेक नावे सांगता येतील. मात्र जागेअभावी हे लिहिणे शक्य नाही. हिंद समाजाचे काम आजही सुरूच आहे. शताब्दीचा मान या संस्थेच्या शिरपेचात खोवला गेला त्यात अनेक महिलांचे आणि इतरांचे योगदान आहे.