
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील ज्या प्रकल्पांचे बांधकाम अर्धवट पडलेले आहे असे प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडाच्या माध्यमातून उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याची तरतूद म्हाडाच्या अधिनियमात करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी लेखी उत्तरात सांगितले.
दादरच्या छप्रा व मोहसीन इमारतींच्या पुनर्विकासाबाबत आमदार किसन कथोरे, अस्लम शेख आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. छप्रा इमारतीचा विकासक उदय सुर्वे यांनी मागील दहा वर्षांपासून रहिवाशांना घर व घराचे भाडेही दिलेले नाही. तसेच इमारतीतील रहिवाशांना हक्काची घरे मिळवून देण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी लेखी उत्तर दिले. छप्रा व मोहसीन इमारतीच्या विकासकाने काम सुरू न केल्याने अंतिम कारणे दाखवा नोटीस दिली आहे. निधीअभावी बांधकाम बंद असल्याचे विकासकाने सांगितले आहे, पण लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे.
– मुंबईतील मोडकळीस आलेल्या व धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने होण्यासाठी आठ आमदारांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार जे प्रकल्प अर्धवट अवस्थेत बंद पडले आहेत असे प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडाच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्याबाबतची तरतूद म्हाडा अधिनियम 1976 मध्ये करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन आहे, असे लेखी उत्तरात नमूद केले.



























































