
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
युएईमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीग स्पर्धेत बुधवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात अफगाणि वादळ घोंगावले. अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद याने फक्त 16 चेंडूत 74 धावांची वादळी खेळी केली. शहजादने या वादळी खेळीदरम्यान 8 उत्तुंग षटकार आणि 6 चौकार लगावले.
बुधवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिंधी संघाने 10 षटकात 94 धावा करत राजपूत संघासमोर 95 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शहजाद आणि मॅक्यूलम यांनी फक्त 4 षटकात विजय मिळवून दिला. मॅक्यूलमपेक्षा शहजादने तुफानी खेळी केली. शहजादने आपल्या या तुफानी खेळीदरम्यान 16 चेंडूचा सामना केला. यातील चौदा चेंडूवर त्याने चौकार आणि षटकार ठोकले तर फक्त दोन चेंडूवर एकेरी धाव काढली. फक्त 12 चेंडूत शहजादने अर्धशतक ठोकत विक्रम नोंदवला.
Power. Destruction. Brutality.
Mohammad Shahzad showed it all tonight! #T10League pic.twitter.com/dPXcCoiRuw
— T10 League (@T10League) November 21, 2018
त्याआधी सिंधी संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शेन वॉटसनच्या 20 चेंडूतील 42 धावांच्या बळावर 94 धावा ठोकल्या. राजपूत संघाकडून हिंदुस्थानचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल याने दोन षटकात 20 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले.




























































