अभिनय माझा श्वास : साक्षी खाड्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनय माझा श्वास  : साक्षी खाड्ये 

मी महर्षी दयानंद कॉलेजमध्ये सेकंड इयर बीएमएममध्ये शिकतेय. लहानपणापासूनच मला नाटकांचे वेड आहे. नाटक आणि अभिनय करायची आवडही तेव्हापासूनचीच… अभिनय करायची म्हटलं म्हणजे स्टेज हवं. तेव्हा कुठलं आलं स्टेज… म्हणून अभिनयाची आवड जोपासता आली नाही, पण जरा मोठी झाले तेव्हा एकांकिका पाहू लागले. तेव्हा कुठेतरी मनात पुन्हा काटायला लागलं की, आता काहीही झालं तरी अभिनय करायचाच… मला आठवतंय, मी आठवीत होते तेव्हा पहिल्यांदा एकांकिका केली. त्यात माझा रोल भिकाऱयाचा होता. खूप कठीण गेलं होतं. पण बरं असं की रोल छोटाच होता. पण गंमत म्हणजे त्यात माझ्या पहिल्या भूमिकेसाठी मला उत्तेजनार्थ बक्षीसही मिळालं. तेव्हापासून माझा नाटकांचा प्रवास जो सुरू झालाय तो अजूनही सुरूच आहे. यापुढेही तो असाच सुरू राहणार.

त्यानंतर मी आणखी दोन नाटकं केली. पथनाटय़ही केले. लघुपट केले. हा सगळा प्रवास मला सिनेमा विश्वापर्यंत घेऊन आला आहे. होय… मी सिनेमांतही काम केलंय. ‘सहा गुण’ असं नाव होतं त्याचं. या सिनेमामुळे मला दिग्गज कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. अमृता सुभाष, सुनील बर्वे, अतुल तोडणकर, आरती सोळंकी यांच्यासोबत काम करताना खूप चांगला अनुभव आला. या सिनेमामुळेच मला एक ओळख मिळाली. घरच्यांनाही माझा अभिमान वाटला.

कलाकार हा नाटकांमधूनच घडतो याची प्रचीती मला आली. त्यामुळे पहिल्या सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी खरोखर खूप मोठा आणि अविस्मरणीय आहे. कलाकाराला भूमिकांची भूक असते म्हणजे असायला हवी. नाटकांमध्ये काम केल्यावरच कलाकारामध्ये ही भूक निर्माण होते. कलाकाराने कसे जगावे हे त्याला नाटकच शिकवते असं मला वाटतं. या वर्षी मी आणखी दोन नाटकांमध्ये काम केले. 22 जुलैला झालेल्या पु. ल. देशपांडे लिखित ‘अंमलदार’ या नाटकात माझी प्रमुख भूमिका होती. आता यापुढेही नाटकांचा हा प्रवास मी सुरूच ठेवणार आहे. माझे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसही आहे. त्यात मी सिनेमॅटोग्राफी करते. या सगळ्यात माझ्या आईबाबांची साथ मला नेहमी मोलाची वाटते.

वेगळय़ा वाटेवरचे छंद तरुणाईला नेहमीच खुणावतात. आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट आम्हालाही सांगा… छायाचित्रासहित.

आमचा पत्ता : Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-25 [email protected] वरही