काळाचौकीत व्यापाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

परळच्या खातू इमारतीत राहणाऱया व्यावसायिकाने स्वतःच्या कारमध्ये बसून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. माझे आयुष्य संपले असा मित्राला मेसेज पाठवला. अश्विन जैन (40) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

साईबाबा मार्गावरील खातू इमारतीत जैन आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. काल गुरुवारी दुपारी ते घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात अश्विन हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर आज दुपारी नागरिकांनी पोलिसांना फोन करून रस्त्यावर पार्क केलेल्या कारमध्ये एक इसम रक्ताच्या थारोळ्यात असल्याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अश्विन जैन रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मित्राला माझे आयुष्य संपले असा मेसेज पाठवला होता. काल घराबाहेर पडताना जैन यांनी त्यांची सोन्याची चेन व अन्य महत्त्वाचा ऐवज घरी ठेवला होता. त्यामुळे जैन यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे आलेल्या नैराशातून जैन यांनी हे पाऊल उचलले असावे असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.