
सामना ऑनलाईन । गुरुदासपूर
डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी फटकारले आहे. मी एक फौजी असून शत्रूच्या मनात काय सुरू आहे ते मला चांगल्याप्रकारे समजते. पंजाबमध्ये बाजवा यांनी काही घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात येईल असा इशाराच कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी बाजवा यांना दिला आहे. या कॉरिडॉरबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे आभार मानले आहेत.
मी सैन्यात काम केले आहे. पाकिस्तानी सैन्यापेक्षा माझा अनुभव जास्त आहे. जनरल मुशर्रफ यांनाही मी वरिष्ठ आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा माझा अनुभव जास्त आहे. तुमच्या मनात काय सुरू आहे. ते मला समजते. फौजी काय विचार करत आहे, ते दुसऱ्या फौजीलाच समजते. देशहितासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी फौजी नेहमी तय़ार असतो. मात्र, सीमेपलीकडून गोळीबार करून दुसऱ्या सैनिकांना लक्ष्य करण्याच्या सूचना पाकिस्तानी लष्कराला कोण देते, हे सगळ्यांनाच माहित आहे. पठानकोट, दीनानगर, कश्मीरात घूसून घातपाती करावाया आणि सुरक्षा दलावर हल्ले करणाऱ्या सूचना कोण देते. ही लष्कराची शिकवण नाही. ही पळपुट्यांची रणनीती आहे. पाकिस्तानी लष्कर पळपुटे असल्याबाबत खेद वाटतो, असेही ते म्हणाले.
पंजाबमध्ये काही घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात येईल असा इशाराही कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी बाजवा यांना दिला. आम्ही पाकिस्तानी लष्कराला पंजाबमध्ये पायही ठेऊ देणार नाही. आमच्या सरकारने 17 वेळा त्यांच्या टोळ्या पकडल्या आहेत. त्यांच्या 81 लोकांना आम्ही पकडले आहे. तसेच 70 शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेडही पकडण्यात आले आहे. एक शीख म्हणून मला करतारपूरला जावेसे वाटते. मात्र, पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून पंजाबची सुरक्षा हे माझे कर्तव्य आहे. राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्याच्या देशात जाण्यास मन तयार होत नसल्यास करतारपूरला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


























































