
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील महत्त्वाचे धरण असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणावर पालिका आता सौरऊर्जा आणि पवनचक्की प्रकल्प उभारणार आहे. यामध्ये दररोज सुमारे ८० ते १०० किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मध्य वैतरणा जल प्रकल्पाची २४ तासांच्या विजेची गरजही पूर्ण होणार आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरण परिसरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. याचा परिणाम धरणाच्या देखभालीवर होतो. मुंबईला दररोज एवूâण तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दररोज ४५५ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा मध्य वैतरणा धरणातून करण्यात येतो. या जल प्रकल्पाच्या कामकाजासाठी मोखाडा येथून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज आणली जाते. जंगल क्षेत्रातून ४० किलोमीटरवरून या धरणावर विजेच्या खांबाद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र या ठिकाणी दररोज १२ ते १८ तास वीज गायब असते. काही वेळा तर पावसाळ्यात तीन ते चार दिवस धरणावर वीज नसते. त्यामुळे धरणाच्या देखभालीमध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे. या धरण प्रकल्पाच्या दररोजच्या कामकाजासाठी ८० ते १०० किलोवॅट विजेची गरज आहे. ही गरज सौरऊर्जा प्रकल्प आणि पवनचक्की प्रकल्पातून पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी २४ तास वीजपुरवठा मिळणार आहे.
जल प्रकल्पाला मिळणार २४ तासांची वीज
मध्य वैतरणा धरणावर सरासरी कमाल तापमान ४५ डिग्री से. असून उष्ण व आद्र्र हवामान असते. तसेच धरण परिसर ६.४० वर्ग किलोमीटर मोकळ्या क्षेत्रात असल्याने धरणावर वाNयाचा वेग २.४ ते ५.०० मी./सेकंद व वर्षभर सरासरी ३.१ मी./सेकंद उपलब्ध असतो. त्यामुळे सौर ऊर्जेच्या मदतीने या धरणाला २४ तास पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. हा वीज प्रकल्प उभारण्यासाठी मे. विजय इंजिनीयरिंग कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस पालिका प्रशासनाने स्थायी समितीमध्ये केली आहे. दोन कोटी ७१ लाख रुपयांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
























































