अशांत मणिपूरच्या बंडखोरीवर शिक्षण हाच उपाय; अरिबम ब्रजकुमार शर्मा ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मणिपूरमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिथली परिस्थिती चांगली नव्हती. मणिपूर सर्वाधिक हिंसाचारग्रस्त राज्य होते. बंडखोरी वाढली होती. एक विशिष्ट विचारधारा आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर राष्ट्रविघातक कृत्ये केली जात. या फुटीरतावादी गटांमध्ये राष्ट्रप्रेम आणि ऐक्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे मोठे आव्हान होते आणि आहे. मणिपूर कल्चरल इंटिग्रेशन कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही मणिपुरीचे जीवन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षणामुळेच या बंडखोर शक्तींशी लढा देता येईल असे प्रतिपादन मणिपूरचे सामाजिक कार्यकर्ते अरिबम ब्रजकुमार शर्मा यांनी केले.

माय होम इंडियाचा ‘वन इंडिया’ पुरस्कार अरिबम ब्रजकुमार शर्मा यांना नागालँडचे राजपाल पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘वन इंडिया’ पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अरिबम शर्मा म्हणाले, मणिपुरी जनतेत शांती, सलोखा निर्माण करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. मात्र ही प्रक्रिया धीम्या गतीने होत आहे.

यावेळी सुनील देवधर म्हणाले, आतापर्यंतच्या सरकारांनी ईशान्येकडील राज्यांना देशाची समस्या आणि दुबळेपणा समजले, पण मोदी सरकार त्यांना देशाची ताकद समजले. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांत ईशान्येकडील राज्यांतील लोकांवर अन्य राज्यांत हल्ले झाले नाहीत. देशाची मानसिकता बदलतेय. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर, अध्यक्ष हरीश शेट्टी, उपाध्यक्ष मोहित कंबोज आदी उपास्थित होते.मणिपुरी गायिका लायश्रम मेमा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.

लोकांची विचारधारा बदलण्यात अपयशी – पद्मनाभ आचार्य
गेल्या चार वर्षांत मी तीनशेपेक्षा अधिक कार्यक्रमांतून ईशान्य हिंदुस्थानवर बोलत आलोय. मात्र तरीही ईशान्येकडील राज्यांबद्दल लोकांची विचारधारा बदलली नाही. ‘माय होम इंडिया’ हे काम करीत असली तरी ते पूर्ण नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे असे स्पष्ट प्रतिपादन नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी केले. पूर्वांचलमधील आतापर्यंतच्या परिास्थितीला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, हे आपले अपयश आहे. खिश्चन लोकांनी तिथे जाऊन काम केले, त्यांनी विद्यापीठे सुरू केली, पण आपली किती माणसे तिथे पोचली? ना अभाविपची ना दुसरी, ना डॉक्टर ना शिक्षक! अशी खंत आचार्य यांनी व्यक्त केली. ईशान्य हिंदुस्थानसाठी सर्मिपत कार्यकर्त्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.