
>>विलास पंढरी<<
ज्याला आपण आपला आर्थिक स्पर्धक समजतो, त्या चीनच्या 11 बँका स्टेट बँकेपेक्षा कितीतरी मोठय़ा आहेत. जगातल्या ज्या मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत त्यांच्या मानाने आपल्या बँका खूपच लहान आहेत. त्यामुळे सोयिस्कर बँका एकत्र करून त्या मोठय़ा करणे ही काळाची गरज आहे व त्या दृष्टिकोनातूनच तीन बँकांच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. एनपीएच्या ओझ्याखाली दबलेल्या हिंदुस्थानी बँकिंग क्षेत्राला मोकळा श्वास घेण्यासाठी बँकांचे एकत्रीकरण ही काळाची गरज आहे.
आपल्या देशातील सरकारी बँकांचा 2.29 लाख कोटींचा एनपीए आता 10 लाख कोटींवर जाण्याच्या अनेक कारणांपैकी एनपीए दाबून ठेवणे, अशी कर्ज खाती पुनःपुन्हा रिस्ट्रक्चर करणे ही मुख्य कारणे आहेत. मात्र रिझर्व्ह बँक आणि तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी बॅलन्स शीट क्लीन करण्याचे सक्त आदेश दिले आणि बँकांना व त्यांच्या ऑडिटर्सना खरे एनपीए दाखवणे भाग पडले. महत्त्वाचे म्हणजे एनपीएची वसुली करणे ब्रँच मॅनेजरची जबाबदारी असते, ती पूर्वीच्या मॅनेजरवर ढकलून चालत नाही. कर्ज मंजूर करताना पूर्वीच्या मॅनेजरने काही गैर केले असेल तर त्या मॅनेजरला शिक्षा होतेच. भ्रष्टाचारात बुडालेल्या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारला जनतेने शिक्षा दिली, पण बँकांच्या हलाखीच्या परिस्थितीला पूर्वीच्या सरकारला जबाबदार ठरवून मोदी सरकार आपली जबाबदारी ढकलू शकत नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात की, यूपीएच्या काळात कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून बँकांना फोन करून कर्जे वाटली गेली. असे आरोप करणे सोपे असले तरी तसा पुरावा समोर आणल्याशिवाय जनतेचा विश्वास कसा बसणार? हे खरे आहे की, बँक राष्ट्रीयीकरण ते 2004 या 35 वर्षांत सरकारी बँकांनी 18 लाख कोटी रुपयांची कर्जे वाटली होती, तर 2004 ते 2014 या यूपीएच्या केवळ 10 वर्षांत हीच रक्कम 52 लाख कोटींवर गेली. त्यामुळे मोदींच्या आरोपात तथ्य असू शकते. पुन्हा मोदी सरकारची लोकप्रियता पूर्वीएवढी राहिली नसतानाही बँकिंग सुधारणा चालू ठेवण्याच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. कारण सध्या 11 सरकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या शीघ्र सुधारात्मक कृतीच्या (पीसीए) अंमलाखाली आहेत व आणखी सहा बँका लवकरच अशा कारवाईखाली येतील.
या पार्श्वभूमीवर तीन बँकांच्या एकत्रीकरणाच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. केंद्र सरकारने स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण करून गेल्या वर्षीच एक मोठी बँक तयार करून आर्थिक व बँकिंग सुधारणासंबंधातील मोठा निर्णय घेतला होता. अर्थात त्यामुळे स्टेट बँक जगातील पहिल्या 50 बँकांत तरी आली. विशेष म्हणजे ज्याला आपण आपला आर्थिक स्पर्धक समजतो, त्या चीनच्या 11 बँका स्टेट बँकेपेक्षा कितीतरी मोठय़ा आहेत. जगातल्या ज्या मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत त्यांच्या मानाने आपल्या बँका खूपच लहान आहेत. त्यामुळे सोयिस्कर बँका एकत्र करून त्या मोठय़ा करणे ही काळाची गरज आहे व त्या दृष्टिकोनातूनच तीन बँकांच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांच्या अंतर्गत मोदी सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे तीन मोठय़ा सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांचं एकत्रीकरण. त्यानंतर अडचणीत आलेल्या आयडीबीआय बँकेला सरकारी क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळाने ताब्यात घेणे हा मोठा निर्णय घेतला होता. तसाच केंद्र सरकारने 17 सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचं विलीनीकरण करण्याची घोषणा करून आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रातील चौथा मोठा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर देशातील तिसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल असे म्हटले आहे. सध्या एकूण व्यवसाय (47.51 लाख कोटी रुपये) विचारात घेता स्टेट बँक एक नंबरवर व एचडीएफसी बँक (14.50 लाख कोटी रुपये) दोन नंबरवर आहे. वरील आकडेवारी बघता खरे तर विलीनीकरणानंतरची ही बँक दोन नंबरवर येते आहे.
सरकारी बँका सध्या प्रचंड एनपीए म्हणजे अनुत्पादक कर्जांमुळे नाजूक स्थितीत आहेत. अनेक तज्ञ व वृत्तपत्रे एनपीएला बुडीत कर्जे म्हणत आहेत. बुडीत म्हणजे वसुली होणार नाही अशी कर्जे. एनपीएमधील काही कर्जे बुडीत असू शकतील. त्यामुळे अशा कर्जांना अनुत्पादक कर्जे (ज्यांच्यापासून उत्पन्न-व्याज मिळत नाही) किंवा थकीत कर्जे म्हणायला हवे. त्यामुळे या कर्जांना सरसकट बुडीत म्हणता येणार नाही. स्टेट बँक विलीनीकरणाप्रमाणेच या बँकांच्या विलीनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. या विलीनीकरणामुळे कामकाज आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधेत चांगला बदल होईल. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचं वित्तीय समर्थन निश्चित केलं जाईल. नेटवर्क, कमी खर्च आणि अनुदानाच्या बाबतीत उत्तम रीतीने ताळमेळ साधला जाईल. कर्मचाऱ्यांचं हित आणि ब्रँड इक्विटीचे संरक्षण केलं जाईल असं वित्तीय सचिव राजीव कुमार यांनी म्हटले आहे. ‘‘विलीनीकरणानंतरही या बँका स्वतंत्रपणे काम करत राहतील’’ असंही संभ्रम निर्माण करणारे विधान त्यांनी केले आहे.
आता उर्वरित सर्व सरकारी बँकाचेही पाच मोठय़ा बँकांमध्ये विलीनीकरण करून सहा मोठय़ा सरकारी बँका करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या तीन बँका एकत्रित पहिले एक धाडसी पाऊल मोदी सरकारने टाकले आहे. पुढील एकत्रीकरण, पीएनबी, इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक मिळून एक, कॅनरा, युको आणि सिंडिकेट मिळून एक नजीकच्या काळात अपेक्षित आहे.
बँका एकत्र करून बँकिंग व्यवस्थेचे सशक्तीकरण होतेच असे स्टेट बँकेतील सहा बँकांच्या विलीनीकरणाने तरी दाखवून दिलेले नाही. 1600 पेक्षा अधिक शाखा बंद करणे, बुडीत कर्जामध्ये वाढ आणि एकत्रित स्टेट बँकेला झालेला इतिहासातील सर्वात मोठा तोटा यासारखे दुष्परिणामच दिसून आले आहेत. अशी वास्तवावर आधारित टीका या एकत्रीकरणावर बँकांच्या युनियन्सनी केली आहे. एकत्रीकरण होत असलेल्या तीन बँकांचे एकत्रित अनुत्पादित कर्ज सध्या 80 हजार कोटींचे आहे.
31 मार्च 2017 ला स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचा मिळून एनपीए 65 हजार कोटी तर स्टेट बँकेचा 1 लाख 12 हजार कोटी होता. तो एकत्रीकरणानंतर वाढून 2 लाख 25 हजार कोटी झाला आहे. सरकारी बँकांच्या अनुत्पादित कर्जात झालेली वाढ पुढीलप्रमाणे –
31-3-2014 2,29,278 कोटी
31-3-2015 2,80,481 कोटी
31-3-2016 5,41,972 कोटी
31-3-2017 6,86,750 कोटी
31-3-2018 8,95,600 कोटी
वरील आकडेवारी पाहता एकत्रीकरण करायचे सरकारने ठरविले असले तरी बँकांची परिस्थिती सुधारेल की नाही हे येणारा काळच सांगेल. अशक्त बँका सशक्तांच्या गळ्यात बांधण्यामधे सशक्त बँकेचेही आर्थिक आरोग्य धोक्यात येऊ शकते हा धोकाही नजरेआड करता येणार नाही.
























































