
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
58 लक्षवेधी मोर्चे, 50 हून अधिक युवकांनी दिलेले बलिदान आणि हजारो समाजबांधवांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी समाजाला फायदा होणार आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कायद्याच्या चौकटीत टिकावे
प्रदीर्घ लढ्यानंतर मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासाठी सरकारवर रेटा ठेवला होता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणाच्या लढाईत शिवसैनिक पहिल्यापासूनच होते, या आरक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आरक्षण मिळाल्याचा आनंद आहेच
मराठा समाजाला आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादासाठी आता सारेच धडपड करीत आहेत. मराठा समाजाने साठ मोर्चे काढले. असंख्य कार्यकत्र्यांनी अंगावर गुन्हे घेतलेत. हे श्रेय घेणारे विसरले. मराठा समाजाने आरपारची लढाई लढली. सर्व राजकीय पक्ष, समाजातील विचारवंत, अभ्यासक, कायदेपंडित यांनी वेळोवेळी आरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका मांडली. या सर्वांचा परिणाम म्हणून आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. या गोष्टीचा आनंद तर आहेच; पण या आरक्षणाच्या लढाईत ज्या समाजबांधवानी आपले बलिदान दिले, त्या माझ्या समाजबांधवांचे देखील यावेळी स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
गोरगरिबांना न्याय मिळावा
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला, ही समाधानाची बाब आहे, हेच आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे, मराठा समाजातील तळागाळातील गोरगरिबांना याचा लाभ झाला पाहिजे, अन्य प्रवर्गाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, त्यामुळे इतर समाजाने नाराज होण्याचे कारण नाही. आरक्षणासाठी 40 युवकांनी दिलेले बलिदान सार्थकी ठरले, असे प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केली.
आम्ही समाधानी आहोत
मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी 58 मोर्चे काढले, त्यासाठी 40 युवक शहिद झाले, हजारो समाजबांधवांवर गुन्हे दाखल झाले. या संघर्षातून मिळालेले आरक्षण हे समाधान देणारे आहे, असे मत बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे प्रदेश सचिव, समन्वयक सुरेश वाकडे यांनी व्यक्त केले आहे. आरक्षणासाठी शहिद झालेल्या तरुणांच्या वारसांना सरकारने घोषित केलेली आर्थिक मदत देऊन त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्रेयवादाची लढाई करणे गैर
मराठा समाजाला आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असं समजून काही पक्षांनी तर फेटे बांधून ‘सेलिब्रेशन’ केले. खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं याचा आनंद तर आहेच. पण ज्यांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले त्या माझ्या समाजबांधवांचे देखील यावेळी स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी
मराठा समाजाने आरक्षणासाठी दीर्घ लढा दिला. या लढ्याची अखेर राज्य सरकारला 16 टक्के आरक्षण देत असल्याचा निर्णय घेणे भाग पडले, आरक्षणाचा निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे, असे मत विजय काकडे यांनी व्यक्त केले.
त्वरित अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले खरे, पण ते कोर्टात टिकायला पाहिजे. मराठा समाजावर 60 वर्षांपासून अन्याय होत आला आहे. समाजाची आर्थिक , सामाजिक परिस्थिती फारच बिकट आहे. मराठा समाजाचे उच्च शिक्षणाचे प्रमाण 4.5 टक्के असून सरकारी नोकरीत मराठा समाजाचे प्रमाण फक्त 6.5 टक्के आहे. त्यातही त्यांना पदोन्नतीत डावलले गेले आहे. समाजासाठी लागू केलेले आरक्षण पदोन्नतीसाठी तात्काळ लागू करून मराठा समाजाचा अनुशेष भरण्यात यावा, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक अॅड. सुवर्णा मोहिते यांनी व्यक्त केली आहे.
सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे फसवणूक करणारे आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने अनुवूâल अहवाल दिला असताना सरकारने 52 टक्क्यामध्येच आरक्षण देणे अपेक्षित होते आणि वाढीव आरक्षणासाठी वेंâद्र सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे होते, मात्र तसे न करता 52 टक्क्याच्या बाहेर दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल का ? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला आहे.
आरक्षणाला स्थगिती येईल असे वाटत नाही
पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येते, त्यासाठी मागासवर्ग आयोगाने त्या समाजाला मागास घोषित केले पाहिजे, गायकवाड आयोगाने घोषित केल्याप्रमाणे मराठा समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण दिले आहे. जर कोर्टात आव्हान दिले तर सरकारने संपूर्ण तयारी केली आहे, यावर स्थगिती येईल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
बलिदान देणाऱ्या युवकांना समर्पित
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बलिदान देणाऱ्या 50 हून अधिक युवकांना हे आरक्षण समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण लढण्याचा झेंडा हातात घेतलेलेले युवक, न्यायालय आणि सरकारचेही त्यांनी आभार मानले आहेत.
राज्य सरकारचे आभार
राज्य सरकारचे आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रथमत: आभार, पण पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या आरक्षणाची पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी सरकारने घ्यावी. आज जे विधेयक मंजूर करून घेतले हे मराठा आरक्षणाचे पहिले पर्व पार पडले आहे. आजपर्यंतचे यश हे आरक्षणात शहीद झालेल्या बांधवांना समर्पित आहे, अशी प्रतिक्रिया बुलंद छावाचे प्रदेश संघटक मनोज गायके यांनी व्यक्त केली आहे.
श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये
मराठा समाजाला आरक्षण दिले म्हणून कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 50 हून अधिक बांधवांनी बलिदान दिले आहे. 58 लक्षवेधी मोर्चे काढले, त्यातून हे आरक्षण मिळाले आहे, ते कोर्टात टिकले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हावा, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक स्वाती नखाते यांनी व्यक्त केली आहे.


























































