
सामना प्रतिनिधी । मुंबई
आर्थर रोड कारागृहात कैदी अक्षरशः एकमेकांना भिडले. सरस ठरण्यासाठी काँटे की टक्कर दिली. कारागृह कर्मचाऱयांनी सर्वांना प्रोत्साहन देत जिंकणाऱयांचा जाहीर सत्कार केला. पण सर्वात भारी प्रदर्शन केले ते नायजेरियन कैद्यांनी. निमित्त होते कारागृह प्रशासनाने आयोजित केलेल्या स्पर्धांचे.
आर्थर रोड कारागृहात खास कैद्यांसाठी फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले होते. फुटबॉलमध्ये नायजेरियन कैद्यांचा बोलबाला राहिला. इतकेच नाही तर एका नायजेरियन कैद्याने संपूर्ण स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीसारखी कॉमेंट्री करून खेळाडूंसह बघणाऱया कैद्यांचे मनोरंजन केले, तर व्हॉलीबॉल स्पर्धेत हिंदुस्थानच्या कैद्यांनी चमकदार खेळ केला. इतकेच नाही तर कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेलादेखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कारागृह अधीक्षक हर्षद आहिरराव यांनी सांगितले.
दिवसभर आणि रोजच्या त्याच त्याच दिनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा, कैद्यांचे मन प्रफुल्लित व्हावे, चांगले काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही मैदानी तसेच कॅरम व बुद्धिबळ खेळांचे आयोजन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चमकदार कामगिरी करणाऱया कैद्यांचा जाहीर सत्कार करून आम्ही त्यांना प्रोत्साहन दिले.
n हर्षद आहिरराव, कारागृह अधीक्षक
























































