
सामना प्रतिनिधी, मुंबई
तलाकची नोटीस धाडून आपल्या पत्नीकडे घटस्फोट मागणाऱ्या आरोपी पतीविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इन्तेखाब आलम मुन्शी असे त्या आरोपी पतीचे नाव असून आपल्याला अटक होऊ नये यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या अटकपूर्व अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
वसई येथे राहणाऱ्या मुन्शी याचा 1998 साली विवाह झाला असून त्याला आणि त्याच्या पत्नीला तीन अपत्ये आहेत. 22 सप्टेंबर रोजी मुन्शी याने तलाक मिळावा यासाठी पत्नीला नोटीस धाडली व घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून आपल्याला केव्हाही अटक होईल या भीतीने आरोपी पती मुन्शी याने पालघरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला; परंतु सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज पार पडलेल्या सुनावणीत मुन्शी याची बाजू मांडणारे वकील अॅड. विन्सेंट डिसिल्वा यांनी कोर्टाला सांगितले की, जून आणि जुलै महिन्यात आपल्या अशिलाने दोन वेळा पत्नीला नोटीस धाडली आहे, मात्र ती नोटीस न मिळाल्याचा कांगावा केला जात आहे. तिहेरी तलाकवर केंद्र सरकारने बंदी घातली असून हा गुन्हा आहे, असा युक्तिवाद आज पत्नीच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत याबाबतचा निकाल राखून ठेवला. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे.

























































