
सामना प्रतिनिधी । सिंदखेडराजा (बुलढाणा)
जालन्यात सिंदखेडराजा तालुक्यातील चिंचोली जहाँगीर येथे केंद्रीय पथकाने बुधवारी 3 वाजता भेट दिली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना पाण्याची पातळी कमालीची खोल गेली व परिसरामध्ये पिक परिस्थीती चांगली नसल्यामुळे शेतकरी व महिला शेतकरी वंदना काकड, गिता घुले, सिंधु काकड यांनी केंद्रीय पथकासमोर व्यथा मांडल्या. त्या व्यथा ऐकून केंद्रीय पथकातील सदस्यही स्तब्ध झाले होते. यावेळी केंद्रीय पथकासोबतच अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, आमदार शशिकात खेडेकर, विनोद वाघ होते.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुका हा मराठवाडा सिमेलगत आहे. या भागामध्ये सतत कमी पाउस पडत आहे. दरवर्षी या भागामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. पर्जन्यमान कमी असल्याने या भागातील शेतकर्यांना नेहमीच खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण होते. सिंदखेडराजा तालुक्यातील चिंचोली जहाँगीर येथे पथक 3 वाजता पोहचले. या ठिकाणी नारायण बाबुराव नागरे यांच्या विहिरीची पाहणी यावेळी त्यांनी केली. विहिरीची खोली सत्तर फुट व त्यामध्ये पाणी फक्त दिड फुट होते. त्यावरुन पाणी पातळी कमालीची खाली गेल्याचे पथकाचे निर्दशनास आणून दिले. त्यांच्या शेतात कपासीची पाहणी पथकाने केली. यावेळी दरवषी साधारणत: एका बोंडामध्ये 6 ग्रॅम कापूस निघतो व यावर्षी फक्त दिड ग्रॅम कापुस बोंडामध्ये निघाला व हेक्टरी फक्त 4 क्विंटल कापसाचे उत्पन्न झाल्याचे असल्याचे शेतकरी नारायण नागरे यांनी सांगितले. या ठिकाणी जवळपास 67 टक्के नुकसान झाल्याचे सांगत खर्चही निघाला नाही व बँकेचे कर्ज कसे फेडणार असा सवाल पथकासमोर मांडला.
पथकाने त्यांना माती परीक्षण केले काय व किसान क्रेडीट कार्ड बद्दल माहिती विचारली परंतु याबाबत शेतकरी अनभिज्ञ होते. यानंतर पथकाने याच शिवारातील नारायण रामभाऊ घुले यांचे शेताची पाहणी केली. यावेळी महिला शेतकर्यांनी पथकासमोर व्यथा माडंल्या. शेतामध्ये खरीपात सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाले. तुर व कापुस हातचे गेले व रब्बीचे शाळु, गहु, हरबरा याची पेरणी अल्प प्रमाणात झाली. जी झाली सुध्दा उगवली नाही, तर आम्ही मुलीचे लग्न कसे करायचे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवाचा. जनावराच्या चार्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवायाचा व कामधंदा नाही त्यामुळे कर्ज करुन खर्च भागवावा लागत आहे. टीमने रेशन मालाबद्दल शेतकर्यांना विचारले असता ते धान्य अल्प मिळत असल्याने त्यात आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, असे शेतकर्यांनी सांगितले. या केंद्रीय पथकामध्ये नीती आयोगाचे संयुक्त सल्लागार मनेश चौधरी व पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सल्लागार एस. सी. शर्मा, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे व जिल्हाधिकारी निरुपमा डांगे जिल्हास्तरावरील अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस खात्याचा तगडा बंदोबस्त होता. सदर पथक पाहणीनंतर लोणारकडे रवाना झाले. हे पथक गुरुवारी परभणी जिल्ह्यात पाहणी करणार आहे.

























































