
सामना प्रतिनिधी, मुंबई
अॅण्टॉप हिल परिसरातील म्हाडा कॉलनीत आज भरदुपारी रेकॉर्डवरच्या आरोपीची हत्या झाली. मरिमुथू देवेंद्र ऊर्फ टी. के. राजा (40) असे त्या मृतकाचे नाव असून दोघांनी घरात घुसून त्याचा गळा चिरला. हत्येचे कारण समजू शकले नाही. टी. के. राजा हा पूर्वी डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव सोबत काम करीत होता.
वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीतल्या सूर्यनिवास या इमारत क्रमांक 3 मध्ये चौथ्या मजल्यावर भाडय़ाने घेतलेल्या खेलीत राहत होता. आज टी. के. राजा घरात एकटाच असताना दुपारी तीनच्या सुमारास दोन अज्ञात इसम त्याच्या घरात घुसले आणि त्यांनी राजाचा गळा सुऱयाने चिरला. त्यावेळी आरोपी आणि राजामध्ये झटापटदेखील झाली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते पळत इमारतीखाली आल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडली. दरम्यान, आरोपींची मोटरसायकल सुरूच झाली नाही. त्यामुळे दुचाकी तेथेच सोडून राजाचे मारेकरी पळतच परिसरातून निसटले. वडाळा टीटी पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली आहे, मात्र राजाची हत्या कोणी व का केली ते समजू शकले नाही.
टी. के. राजा पूर्वी डी. के. रावसोबत काम करीत होता. नवी मुंबईत 66 लाखाची बँक रॉबरी व त्यावेळी एका पोलीस अधिकाऱयावर गोळीबार त्याने केला होता. त्यामुळे ‘मोक्का’नुसार त्याला अटक झाली होती. तीन वर्षांपूर्वी तुरुंगातून सुटल्यानंतर तो शीव-कोळीवाडा परिसरात येऊन राहत होता. त्याचे कुटुंबीय त्याच परिसरात पंरतु वेगळय़ा इमारतीत राहत होते. तर राजा म्हाडा कॉलनीत भाडय़ाने खोली घेऊन राहत होता. त्याच्याविरोधात 15 हून अधिक गंभीर गुह्यांची नोंद असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपी ज्या मोटरसायकलवरून आले होते. पण त्यांना त्या दुचाकीवरून पळून जाता आले नव्हते. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र त्या दुचाकीची माहिती घेतली असता ती दुसऱ्याच कोणाची असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.






























































