
सामना प्रतिनिधी, येवला
सध्या कमी पाण्यात कांदा, भाजीपालासारखे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. यामुळे गहू व हरबरा या पेरणीचे क्षेत्र घटले. त्यात वाढ व्हावी आणि शेतकऱयांनी बियाण्याची निर्मिती करावी म्हणून महाबिज ही बिजोत्पादनामधील कंपनी पुढे आली आहे. येवल्यातील महाबिजचे वितरक नंदा सिडस येथे अनुदानावरील बियाणे विक्री सुरू झाली आहे.
बियाण्यावरील अनुदानामुळे शेतकऱयांना 40 ते 45 टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे. शेतकऱयांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी खुल्या वर्गातील शेतकऱयांनी सातबारा व आधारकार्ड तर राखीव प्रवर्गातील शेतकऱयांनी सातबारा, आधारकार्डसह जातीचा दाखला बरोबर ठेवणे गरजेचे असल्याचे नंदा सिडसचे संचालक नंदन मुंदडा यांनी सांगितले.
येवला तालुक्यामध्ये याकरिता दहा मेट्रिक टन बियाण्याचा पुरवठा नंदा सिडस येथे केला आहे. बाजारात गहू बियाण्याचे सरासरी 3 हजार 400 रुपये क्विंटल असे दर आहेत. या अनुदानामुळे गहू बियाणे सुमारे 1800 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये शेतकऱयांना मिळत आहे.


























































