
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दिघ्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील याचिकेचा याचिकाकर्ता मीच आहे, असे सांगून ब्रिजेश मिश्रा या आरटीआय कार्यकर्त्याने गेल्या तीन वर्षांपासून सशस्त्र पोलीस संरक्षण घेतल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी आज केला. त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांच्या वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.
ब्रिजेश मिश्रा यांनी पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी केलेल्या झोलची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजीव मिश्रा यांनी सांगितले की, दिघ्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आपण 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिचा क्रमांक 80/2013 असा आहे. सदर याचिकेवर सुनावणी सुरू असताना ब्रिजेश मिश्रा यांनी आणखी काही अनधिकृत बांधकामांची माहिती न्यायालयाला देऊन एक हस्तक्षेप याचिका दाखल केली. तिचा क्रमांक 105/2015 असा होता. मात्र ब्रिजेश हे स्वतः अनधिकृत इमारतीत राहत असल्याने आणि त्यांच्यावर 30 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप झाल्याने त्यांची याचिका फेटाळून लावली.
20 लाख संरक्षण शुल्क
ब्रिजेश यांनी अनधिकृत बांधकाम विरोधातील याचिकेचा याचिकाकर्ता मीच आहे, असे भासवून नोव्हेंबर 2015 पोलीस संरक्षण घेतले. समाजसेवा शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी ब्रिजेश मिश्रा यांना 55 हजार रुपयांचे शुल्क घेऊन एक महिन्यापुरते संरक्षण देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांच्या संरक्षणाचे शुल्क 20 लाख रुपये झाले आहे.



























































