राहुल गांधींचे जबरदस्त कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून भाजपविरोधात उठलेला आवाज ऐकण्याची जबाबदारी काँग्रेसवर आली आहे. आमचे सरकार जनतेचे ऐकून काम करेल. आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण करतानाच त्या राज्यांना नवे ‘व्हिजन’ देऊ, अशी ग्वाही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिली. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला तीन राज्यांत काँग्रेसने सत्तेवरून हद्दपार केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसला तीन राज्यांत मिळालेला दणदणीत विजय ही परिवर्तनाची सुरुवात आहे, असे सांगतानाच भाजपला आम्ही आजच्यासारखेच 2019च्या लोकसभा निवडणुकीतही हरवणार आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे केंद्रातील भाजप सरकार जे काही करत आहे ते देशातील जनतेला मुळीच आवडलेले नाही. तमाम देशवासीय त्यांच्यावर नाराज आहेत, हाच आजच्या निकालांचा संदेश आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले कुठलेही आश्वासन न पाळून जनतेचा पुरता भ्रमनिरास केला असून अहंकारामुळेच भाजपचा पराभव झाला, असेही ते म्हणाले.

मोदी 2014मध्ये रोजगार, शेतकरी, भ्रष्टाचार याच मुद्दय़ांवर जिंकले होते. पण ते ज्वलंत प्रश्न आजही कायम असतानाच उलट मोदीच भ्रष्टाचारात अडकलेत हे जनतेला आता कळून चुकले आहे, असे त्यांनी सांगितले.

तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेला विजय हा तरुणवर्ग, शेतकरी, छोटे व्यापारी यांनी आणि मेहनती कार्यकर्त्यांनी मिळवून दिला आहे, असे सांगून राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत त्या सर्वांचे जाहीर आभार मानले. काँग्रेस कार्यकर्त्यांना आपण बंद दाराआड नेहमीच ‘बब्बर शेर’ म्हणतो. पण आज त्यांचा जाहीररीत्या ‘बब्बर शेर’ म्हणून गौरव करत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणा, मिझोराममध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र राहुल यांनी त्या राज्यात जे पक्ष जिंकले त्यांचेही जाहीररीत्या अभिनंदन केले.

आम्ही जनतेचा जो कौल आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करतो. जय आणि पराजय हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यापुढेही आम्ही हिंदुस्थानच्या विकासासाठी अधिक मेहनत करू.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी, ट्विटरवर

‘ईव्हीएम हटाओ’वर ठाम
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला हटवून काँग्रेस सत्ता काबीज करणार असली तरी ‘ईव्हीएम’चा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, असे राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत आवर्जून स्पष्ट केले.

जनतेने भाजपला धडा शिकवला – संजय राऊत
हा केवळ काँग्रेसचा विजय नसून भाजपविरुद्ध जनतेने व्यक्त केलेला हा राग आहे, त्यांना शिकवलेला हा धडा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या निकालावर दिली आहे. 2014मध्ये मध्य प्रदेश, राजस्थानमधूनच विजययात्रा निघाली होती. मात्र आता तेथेच पूर्णविराम मिळाला आहे. आता विचार करण्याची वेळ आली आहे. एनडीएतील घटक पक्ष सोडून चालले आहेत. शिवसेनाही खूश नव्हती आणि नाही. ज्या पद्धतीने देशाचा कारभार सुरू होता त्यानुसार आता चिंतनाची नाही तर आत्मचिंतनाची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हिंदी पट्टय़ातील पराभव… भाजपला 2019ची चिंता
– मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पट्टय़ातील राज्यांतील पराभव भाजपसाठी 2019च्या निवडणुकीची चिंता वाढविणारा ठरला आहे.

– या तीन राज्यांत लोकसभेचे 65 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 62 खासदार निवडून आले होते. राजस्थानात तर सर्व 25 मतदारसंघांत भाजपचा विजय झाला होता. आज या तीन राज्यांतील निवडणुकांच्या निकालामुळे भाजपला 2019 मध्ये हादरा बसू शकतो. 2014 ची पुनरावृत्ती आता शक्य नाही, असा अंदाज आहे.