भाजप नेत्यांसमोर संघ कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

तिरुवनंतपुरम येथे भाजप नेत्यांच्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वेणूगोपाल राव असे त्या व्यक्तीचे नाव असून तो संघाचा कार्यकर्ता असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. वेणूगोपाल हा ७० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

शबरीमाला मंदिराच्या परिसरात सरकारने तैनात केलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्ताविरोधात सध्या भाजपचे नेते आंदोलन करत असून ज्येष्ठ नेते सी. के पद्मनाभन हे उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास वेणूगोपाल हा अय्यप्पा अय्यपा ओरडत उपोषण स्थळी आला व कुणाला काही कळायच्या आत त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून दिले. त्यानंतर त्याने भाजपच्या नेत्यांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्याला अडवले व आग विझवली. या घटनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.