
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील मयूरबन कॉलनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पाठलाग करुन पकडले. एकजण मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यांच्याकडून कुलूप तोडण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी गज, बरचा, कोयता, पळून जाण्यासाठी वापरलेला अॅटोरिक्षा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरातील मयूरबन सोसायटीमधे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले असताना स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि त्यांच्या पथकाने अॅटो क्रमांक एम.एच.२४ एटी ०३७८ ला अडवले. दोघांच्या अॅटोरिक्षातच मुसक्या आवळण्यात आल्या. इतर दोघांना पाठलाग करुन पकडण्यात आले. एकजण फरार होण्यास यशस्वी झाला. त्यांच्याकडून अॅटोरिक्षा क्रमांक एम.एच.२४ एटी ०३७८, लोखंडी धारदार कोयता, बरचा कुलूप तोडण्याचे एक लोखंडी गज जप्त करण्यात आले. चौघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे.
अतिक आजम सय्यद रा.खाटिक गल्ली अहमदपूर, अतिक सत्तार सय्यद रा. चुरमुरे गल्ली लातूर, बाबा सत्तर सय्यद रा. चुरमुरे गल्ली लातूर, योगेश पांडूरंग सुर्यवंशी रा. हरीभाऊ नगर लातूर, शेख अली गौस रा. अंजली नगर लातूर या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तरकसे हे करीत आहेत.































































