
काशिराम गायकवाड । कुडाळ
मुंबई गोवा महामार्गावरील पिंगुळी गुढीपूर येथील गादी कारखान्याला आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
खान यांचा पिंगुळी गुढीपूर येथे केजीएन गादी नावाचा कारखाना आहे. बुधवारीच त्यांनी सुमारे तीन लाखांचा माल भरला होता. रात्री 9 च्या सुमारास हा कारखाना बंद असताना आतून धूर येत असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारखाना मालकाला ग्रामस्थांनी कल्पना देत घटनास्थळी आग विझवण्यासाठी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाला कल्पना देताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवानांनी मोठ्या शिताफीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यात अग्निशामन अधिकारी जे.आर.दळवी, प्रमुख अग्निशामन विमोचक विवेक राणे, विमोचक दिलीप दळवी, एस.के.जाधव, व्ही.टी.शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्याला माहीती देताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
आगीत बुधवारी भरलेला तीन लाखांचा माल तसेच यापूर्वीचा माल व इतर साहित्य जळून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
































































