राममंदिर आणि राफेलवरून संसद ठप्प! रणकंदन!! शिवसेना खासदारांनी संसद दणाणून सोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
loksabha

विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली

‘जय श्रीराम’, ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणा देत शिवसेना खासदारांनी आज संसद दणाणून सोडली. 2014च्या जाहीरनाम्यात अयोध्येत राममंदिराचे आश्वासन देणाऱ्या भाजपला याचा विसर पडला आहे. राममंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा मुद्दा आहे. त्यामुळे ‘काहीही करा, नवा कायदा करा पण राममंदिर झालेच पाहिजे’ असा आक्रमक पवित्रा शिवसेना खासदारांनी घेतला. यावेळी रणकंदन माजले. या गोंधळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, राफेल विमान खरेदी प्रकरणावर काँग्रेसने ‘जेपीसी’ची मागणी करीत गोंधळ घातला. राममंदिराच्या मुद्दय़ावर शिवसेनेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शिवसेना संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन केले.

आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवेसना खासदारांनी बॅनर फडकावत वेलमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात ‘जय श्रीराम’चा नारा दणाणला. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांना बोलण्याची संधी दिली. अडसूळ यांनी राममंदिरप्रश्नी भाजपने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेचा समाचार घेतला.

भाजपने राममंदिर निर्माणाचे आश्वासन आपल्या 2014 च्या जाहीरनाम्यात दिले आहे. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेवर होते त्यावेळी त्यांना 25 घटकपक्षांना घेऊन सरकार चालविण्याची कसरत करावी लागत होती. त्यावेळी आघाडी सरकारची सबब सांगून राममंदिराचा विषय मार्गी लावला नाही, मात्र सध्याच्या मोदी सरकारला लोकसभेत पूर्ण बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयासह विविध कायदेशीर पर्याय सरकारपाशी आहेत. सरकार राममंदिरासाठी नवा कायदादेखील करू शकते, मात्र सरकारची मानसिकता तशी दिसत नाही. भाजपला रामाचा विसर पडला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच अयोध्या दौरा करून भाजपला आपल्या विसरलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे ‘काहीही करा, कायदेशीर लढाई लढा, मार्ग काढा, राममंदिर झालेच पाहिजे’ अशा शब्दांत खासदार अडसूळ यांनी भूमिका मांडली. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभा दणाणून गेली. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. दरम्यान, काँग्रेसची राफेलप्रकरणी घोषणाबाजी तसेच कावेरी जलवाटपाचा विषय आणि तामीळनाडूतील शेतकऱयांच्या प्रश्नावरून आजही लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेचे कामकाजही तहकूब

राज्यसभेतही कावेरीच्या पाणीवाटपाच्या मुद्दय़ावरून जबरदस्त गदारोळ झाल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी संतापाच्या भरात सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. आजच्या दिवसाचे तरी किमान भान ठेवा. लोकशाहीच्या पवित्र मंदिरांचे रक्षण करताना सुरक्षारक्षक व संसदेतील कर्मचाऱयांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे, अशा शब्दांत व्यंकय्यांनी खडसावले.