शिलालेखांचे संदर्भ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रतींद्र नाईक

सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात नुकताच प्राचीन शिलालेख सापडला… कसे असतात या शिलालेखाचे ऐतिहासिक संदर्भ…

सोलापुरातील प्रसिद्ध भुईकोट किल्ल्यात इतिहासकालीन शिलालेख अभ्यासकांच्या नुकताच दृष्टिक्षेपात पडला. या शिलालेखावरील मजकुराचा नेमका अर्थ काय याचा अभ्यास होत असला तरी हिंदुस्थानात यापूर्वी अनेक शिलालेख आढळून आले आहेत. शिलालेख म्हणजे नेमके काय? या शिलालेखावरील माहितीचा काय उपयोग? शिलालेखावरील मजकुरांमुळे इतिहासकारांना कोणती नवी माहिती मिळाली आहे? हे शिलालेख कोठे कोठे आढळले आहेत. चला तर याची माहिती घेऊ.

शिला म्हणजे (शिळा) दगड. लेख म्हणजे लिखाण. लिहिलेला मजकूर कायमस्वरूपी टिकून राहावा म्हणून दगडावर एखादा मजकूर अथवा संदेश कोरून ठेवणे होय. यालाच शिलालेख असे म्हणतात.

अशोकाचा शिलालेख – हिंदुस्थानातील इतिहासात सर्वात बलाढय़ राजा म्हणून सम्राट अशोका ओळखला जातो. अशोकाचे शिलालेख केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर पाकिस्तान, भुतान, नेपाळ आदी देशांमध्येही आढळून येतात. सम्राट अशोकाच्या काळात हे शिलालेख गोलाकार स्तंभ, गुहा आणि गोल घुमटांवर आढळून येतात. मौर्य काळातला सम्राट अशोक याने इसवी सन पूर्व 272 ते इसवी सन पूर्व 232 या काळात हे शिलालेख तयार करून घेतले असून राजाने दिलेली आज्ञा त्यावर कोरून ठेवण्यात आली आहे.

अक्षीचा शिलालेख – रायगड जिह्यातील अलिबागमध्ये अक्षी हे गाव असून या गावात मराठीतील पहिला शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखावर शके 934 म्हणजेच इसवी सन 1012 असा उल्लेख करण्यात आला आहे. शिलाहार वंशीय राजा पहिला केसी देवराय याचा प्रधान भइर्जु सेणुई याच्या काळात हा शिलालेख कोरण्यात आला असून देवीकरिता नऊ कुवली धान्य अर्पण केल्याचा उल्लेख आढळून येतो. ही शिळा अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभी करून ठेवेली आहे.

होट्टल शिलालेख – महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती भागात होट्टल ऐतिहासिक स्थळ असून या ठिकाणी तीन शिलालेख आढळून येतात. यातील दोन शिलालेख कानडी भाषेतील आहेत, तर एक शिलालेख नागरी भाषेत आहे. होट्टल येथील शिलालेखावर कोरण्यात आलेल्या कानडी अक्षरांवरून इसवी सन 1101, तर तिसरा शिलालेख इसवी सन 1068 ते 1076 या काळातील हा शिलालेख असावा. अशी शक्यता इतिहासकार व्यक्त करीत आहेत.

सोलापुरातील शिलालेख – सोलापूर जिह्यात उत्खननादरम्यान अनेक शिलालेख आढळून आले आहेत. हे लेख मराठी, कन्नड, फारसी, मोडी, देवनागरी या लिपींमध्ये आहेत. सोलापूर जिह्यातल्या भुईकोट किल्ल्यात नवीन शिलालेख सापडला आहे. फारसी लिपीतील आठ ओळींचा हा शिलालेख आदिलशहाच्या काळातील असावा, असा अंदाज इतिहासकार व्यक्त करीत आहेत. भुईकोट किल्ल्यात बारा शिलालेख आढळून आले असून नव्याने साडपलेला शिलालेख तटबंदीच्या खालच्या बाजूस एक फूट अंतरावर मिळाला आहे.

हतगडावरील शिलालेख – नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात सातमाळा पर्वतरांगेत हतगड किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावर 469 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. देवनागरी-संस्कृत अक्षरांमध्ये कोरण्यात आलेला हा शिलालेख आजही चांगल्या अवस्थेत आहे. उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट, तर रूंदीने दोन फूट चार इंचाचा आहे. सोळा ओळींचा हा शिलालेख इसवी सन 1547 सालातील राज्यकर्ता बागुलवंशी राजाच्या पराक्रमाची साक्ष देतो.

[email protected]