
सामना प्रतिनिधी । मुंबई
बडोद्याने मुंबईला रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटातील लढतीत चोख प्रत्युत्तर दिले. विष्णू सोलंकीच्या नाबाद 128 धावा आणि आदित्य वाघमोडेच्या नाबाद 87 धावांच्या जोरावर बडोद्याने पहिल्या डावात दुसर्या दिवसअखेरीस 1 बाद 244 धावा तडकावल्या. मुंबईने पहिल्या डावात 465 धावा केल्या असून आता बडोद्याचा संघ 221 धावांनी पिछाडीवर आहे.
मुंबईने 8 बाद 439 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांचा डाव 465 धावांमध्येच गारद झाला. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या हार्दिक पांड्याने 81 धावांत मुंबईचा निम्मा संघ बाद केला. शिवम दुबेने केदार देवधरला 11 धावांवर बाद करीत बडोद्याला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर विष्णू सोलंकी व आदित्य वाघमोडे या जोडीने दुसर्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी रचली. आदित्य वाघमोडेने 2 षटकार व 9 चौकारांसह 87 धावांची आणि विष्णू सोलंकीने 17 चौकारांसह नाबाद 128 धावांची खेळी साकारली.



























































