
सामना प्रतिनिधी । ग्वांझू
हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने बीडब्ल्यूएफ जागतिक टूअर फायनल्स या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत अगदी रुबाबात अंतिम फेरीत धडक मारली. स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूने सेमी फायनलमध्ये रॅचनोक इंतानोन हिचे कडवे आव्हान परतवून लावत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. आता जेतेपदाच्या लढतीत तिला नोझोमी ओकुहरा हिचा सामना करावा लागणार आहे. मात्र पुरुषांच्या एकेरीत हिंदुस्थानला निराशेचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणार्या समीर वर्माला उपांत्य फेरीतच हार सहन करावी लागली.
23 वर्षीय पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इंतानोनवर 21-16, 25-23 अशा फरकाने 54 मिनिटांमध्ये विजय मिळवला. दरम्यान, ऑल इंग्लंड चॅम्पियन व जागतिक चॅम्पियनशिपमधील रौप्य पदक विजेता शी युकी याने समीर वर्माला 21-12, 20-22, 17-21 अशा फरकाने पराभूत केले. समीर वर्माने ही लढत मॅच पॉइंटवरून गमावली ही खेदजनक बाब.



























































